मानवाने अथक प्रगती करत आपल्या विकासाच्या कक्षा रूंदावल्या. नवनवीन शोध नवनवे तंत्रद्यान विकसित केले गेले. जुन्या पध्दतींना मागे टाकत नव्या पध्दतींचा शोध लावला. परंतु हे होत असताना पर्यावरणाकडे पुर्णत: दुर्लक्ष केले गेले हे मात्र निर्माण झालेल्या असंख्य समस्यांतून दिसत आहे. निश्चितपणे याच्या होणाऱ्या परिणामाचा विचार त्या त्या देशातील शासन यंत्रणेने केला असेल. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. हे तितकेच सत्य आहे. मानवी जीवन हे धावते झाले आहे,हे नकळत तोंडातून आज बाहेर पडते आहे. या मोटारीची जोड मिळाली. धावते म्हणजे काय होते तर वाहतुक होते. माणसे, सामान व अनेक प्रकारच्या वस्तूंचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत स्थलांतर होते. पूर्वी माणसाकडे दळणवळणाची साधने अपुरी होती, त्यामुळे व्यापार, व्यवहार करताना पायी प्रवास किंवा घोंडे, उंट, बैलगाडी याचा वापर होत होता. परंतु आधुनिकीकरणाच्या युगात आपण मोटारीच्या शोधाने गतीमान झाले. हे तितकेच सत्य आहे. परंतु आपण पर्यावरणाचा विचार न करता इतक्या मोठ्या प्रमाणात मोटारींची निर्मिंती केली. आज अपवाद सोडल्याच प्रत्येक घरात एक तरी गाडी आहे. परंतु अशी अनेक घरे आहे, तेथे एकापेक्षा जास्त गाड्या आहेत. गाडी नसावी असा माझा मुळीच दाव नाही. पण मर्यादा असणे गरजेचे आहे.
माझ्या बोलण्यानंतर आम्ही पैसे देतो, तुम्हाची काय अडचण आहे ह्याही प्रतिक्रिया येतील. परंतु पर्यावरण ही सार्वजनिक मालमत्ता आहे, तिची हानी करण्याचा कुणालाही हक्क नाही. मानवी जीवनावर मोटारीचे कोणते परिणाम झाले आहेत.याचा आपण ऊहापोह करूयात.
वाढते प्रदूषण
गाडी बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापासून गाडी कारखान्यात तयार होत असताना आणि तयार झाल्यानंतर मोठ्या प्रमाण पर्यावरणाची हानी आणि प्रदूषण करते.गाड्या रस्त्यावरून धावत असताना ओकाणार धूर आणि मोठमोठ्याने वाजविले जाणारे हाँर्न, मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणात दिवसेंदिवस भर टाकत आहेत. वाढत्या वायूप्रदूषणाचा विळखा दिल्ली सारख्या राज्याला सहन करावा लागत आहे. गाड्यांच्या धुरातून हानिकारक रसायने आणि हायड्रोकार्बनची वारेमाप निर्मिती होते. प्रामुख्याने त्यामध्ये कार्बन डायआँक्साइड, सल्फर डायआँक्साइड, नायट्रोजन डायआँक्साइड, कार्बन मोनाँक्साइड, हायड्रोकार्बनचा समावेश होते. वाढत्या वायुप्रदूषणाने तापमानवाढीची समस्या निर्माण झाली आहे. हे आज जगापुढील मोठी समस्या निर्माण झाली आहे. आज सत्य परिस्थिती समोर असताना दुसरी राज्य यातून धडा घेण्यास तयार नाही.
आरोग्यावर होणारे परिणाम
मोटारीतून होणाऱ्या प्रदूषणाबरोबर इतर प्रदूषकेही आरोग्यावर परिणाम करतात. त्याचा मानवाच्या शरीरावर बरोबरच बुध्दीवरही परिणाम करत असतात. याचा विचार माऩव करताना दिसत नाही. आज समाजव्यवस्थेमध्ये गरीब-श्रीमंतीची इतकी दरी निर्माण झाली आहे की जो तो आपल्या पुरता विचार करताना दिसत आहेत. परंतु वायुप्रदूषणाचा मानवी आरोग्यावर काय विपरित परिणाम होतो, हे पुढील उदाहरणांवरून पाहूयात :
हायड्रोकार्बन्स :- थकवा,खोकला,डोळ्यांच्या समस्या, कँन्सर इ.
कार्बन मोनाँक्साइड :- प्राणवायूची कमतरता, हृदयावर ताण इ.
कार्बन डायआँक्साइड :- हृदयविकाराचा अँटँक, तात्काळ मृत्यू, मृत्यूपिंड विकार, रक्तदाब, मज्जासंस्था विकार इ.
बेन्झिन :- मज्जासंस्था नाश, फुफ्फुसाचा कर्करोग इ.
सल्फर डायआँक्साइड :- श्वसन संस्थेचे विकार, खोकला, दमा, घटसर्ष इ.
अलीकडेच वायू प्रदूषणामुळेही मधुमेहाचा धोका वाढत असल्याचे “वाँशिग्टन युनिव्हर्सिटी स्कूल आँफ मेडिसिन” च्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मधुमेह हा आजार जीवनशैली आणि खाण्याच्या सवयीमुळे होते. मात्र या आजारासाठी वायू प्रदूषणही तितकेच जबाबदार असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबीचा विचार करणे अपेक्षित आहे. परंतु तो तितक्या प्रमाणात होताना दिसत नाही.
अपघातात लक्षणिय वाढ
मोटारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आपल्याला दररोजच्या अनुभनातून दिसत आहे. मोटारीचा वाढता वेग आणि गाड्या कंट्रोल न झाल्यामुळे आज दिवसाला हजारोंना मृत्यू च्या विळख्यात जावे लागत आहे. हजारोंना यामुळे अपंगत्व, असाह्य वेदनांना समोरे जावे लागत आहे. परंतु तरीही आजची फँशन आणि शायनिंगच्या आहारी गेलेली तरूणाई नाहक बळी जात आहे. कारण मोटारींची संख्या इतकी वाढली आहे की रस्ते सुध्दा अपुरे पडू लागले आहे. मग वेगावर मर्यादा न ठेवल्यामुळे आपल्याच हाताने ते मरणाला सामोरे जात आहेत. जीवन आज इतके स्वत:झाले आहे का? याचा विचार करणे गरजेचे आहे. देशातील मोटारींची प्रत्येक माणसामागील आकडेवारी पुढीलप्रमाणे:
वाहतुक कोंडी
ग्रामीण भागाकडून शहराकडे आज रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. शहरांवर लोकसंख्येचा ताण वाढतो आहे. शहरे बकाल झालेली आहे. गर्दीने शहरांचाच जीव घुसमटतो आहे. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्याला पर्यायी म्हणून उडाणपूलांची निर्मिती होत आहे. परंतु तरीही मार्ग निघताना दिसत नाही. पुणे, मुंबई सारखी शहरे आज वाहतूक कोंडीला सामोरे जात आहे. पुण्यासारख्या शहरातून बस ने बाहेर पडायचे म्हटले तरी एक तास लागतोच. त्यात कानांना न सहन होणारे हाँर्न आणि धूराचा सामना करावाच लागतो. त्यामुळे शहरातील सिग्नल लावूनही कोंडी सुटण्यास मार्ग निघत नाही.
आज माणसाला भाजी मंडईत जायचे म्हटले तरी गाडी लागते. पाच मिनिटाच्या अंतरावर जायचे झाले तरी गाडी हावी. परंतु त्यात आज प्रत्येक शहरांत पार्किंगाचा प्रश्न भेडसावत आहे. काही ठिकाणी तर माणसे रस्त्यातच गाड्या उभ्या करतात, मग वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याचा नाहक त्रास बाकी लोकांना होत असतो. शहरातील अनेक लोक आता म्हणू लागले आहेत. शहरात मोठी गाडी घेऊन जायचे म्हटले की नको रे बाबा…त्यात पार्किंग कुठे करणार हा मोठा प्रश्नच आहे. वाढती कोंडी सोडविण्यासाठी अनेक ठिकाणी सिग्नल लावले जात आहेत. तसेच “वन वे” सारखे मार्गही अवलंबले जात आहेत. परंतु यातून मार्ग निघणार नाही हे नक्की आहे. त्यासाठी पर्यायी मार्गच उपयुक्त ठरेल.
महामार्गाची निर्मिती धोकादायक
वाढती लोकसंख्या आणि वाढत्या मोटारी(गाड्या) यांचा विचार करून सरकार फक्त महामार्गांचे रूंदीकरण करून विकासाचे भंपक माँडेल समोर आणत आहे. खरे तर हे फसवे आहे. याचा आपण विचार करणार आहोत की नाही? दुपदरी रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी होऊ लागल्यानंतर चार पदरी रस्ते बनविले गेले. त्यासाठी काळी, कसदार, पिकाऊ जमीन हस्तांतरीत केली गेली. असंख्य झाडांची कत्तल केली गेली. पर्यावरणाचा विचार कागदावर राहिला गेला. पर्यावरणाची अप्रतिम हानी झाली. रस्ते बनविण्यासाठी डोंगर पोखरले गेले, त्यातून धुळीचे साम्राज्य तयार झाले. अनेकांना श्वसनाचे आजार होऊ लागले. पर्यावरणाचे चक्र कोलमडले. फक्त आम्हाला विकास होणार हे गाजर दाखविले गेले. याचा विचार केला का? मोटारींवर पर्याय नियंत्रण सोडून आम्ही महामार्गाच्या रूंदीकरणाचे स्वप्न दाखवत आहोत. गुळगुळीत, चकचकीत रस्ते हाच विकास दाखवत आहोत.
आज देशात समृध्दी महामार्ग, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग सारखे 10 राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ज्यात हजारो एकर पिकाऊ जमीन उध्वस्त होणार आहे. विरोध होत असताना जमीन संपादन केले जात आहे. पोलिस बळाचा वापर केला जात आहे. मग हा विकास खरेच विकास आहे का? एकीकडे पर्यावरणाविषयी कळवळा आणि दुसरीकडे शासन भक्षक बनले आहे. याचा विचार करून हा विध्वंसक विकास रोखणे गरजेचे आहे.
जमीन आणि पाणी यांवरील परिणाम
वाढत्या मोटारींमुळे महामार्ग तयार झाल्यामुळे जमीनी उध्वस्त होत आहेत. परंतु महामार्गाच्या कडेच्या जमिनीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मोटारीचा वापर होताना टायर,ब्रेक्स आणि रस्त्याच्या पृष्ठभागामुळे अखडले गेले पदार्थ हवा प्रदूषणात भर घालतात. तसेच त्यांचा माती व पाण्याशी संबंध येऊन त्यांचेही प्रदूषण होत आहे. तसेच मोठमोठ्या महामार्गांमुळे पाणी जमिनीत झिरपण्याऐवजी वाहून जात आहे. नद्यांना पुराची परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच मोटारीची बांधणी करताना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले जातात. हे आज सर्वत्र सुरूच असताना दिसत आहे.
अवैध वाहतूकीला आळा घाला
सार्वजनिक वाहतुक बळकटीकरणासाठी अवैध वाहतुकीला आळा घालणे गरजेचे आहे. परंतु वाहतुक नियंत्रणाची जबाबदारी असणारे पोलिस प्रशासनाच्या संगनमताने अवैध वाहतूक सुरू आहे. ज्यात खालपासून वरपर्यंत हप्ते पोहोचवले जातात. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डबघाईला आली आहे. महाराष्ट्राचे एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे समोर आले आहे. याला अवैध वाहतूकही तितकीच जबाबदार आहे. खाजगी बसेसवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे; परंतु त्यावर शासनाचे कुठलेही नियंत्रण दिसत नाही. याला कुठे तरी अटकाव करणे गरजेचे आहे. काही दिवसापूर्व केरळमधील कन्नूर मध्ये गेलो होतो. तेथे बऱ्याच बसेस या खाजगी आहेत. परंतु त्या खाजगी बसेस ना! सकाळी आल्यानंतर तेथील वाहतूक विभागाकडे नोंद अनिवर्य आहे. तसेच संध्याकाळी जाताना पण नोंद आवश्यक आहे. हे तेथील खाजगी बसेसवर असलेले नियंत्रण आहे पऱंतु आपल्या महाराष्ट्रात यावर शासनाचे कुठलेही नियंत्रण ऩाही. यावर निर्बंध गरजेचे आहेत.
सार्वजनिक वाहतूकीचे बळकटीकरण
आज वाढते प्रदूषण आणि होणारी वाहतूक कोंडी यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेची नाळ जोडली गेलेल्या रेल्वे,राज्य परिवहन वाहतूक सेवा सक्षम करणे गरजेचे आहे. चांगल्या बसेस, मुबलक प्रमाणात गाड्या आणि फेऱ्या, वेळेचे बंधन, प्रशस्त व्यवस्था, स्टाँपजवळ पायभूत सुविधांची उपलब्धता (उदा. पिण्याचे स्वच्छ पाणी, सुलभ स्वच्छतागृहे [स्वच्छ], दुर्गंधी मुक्त वातावरण) इ. सुविधांची कमतरता नसेल तर निश्चितपणे जनतेची ओढ सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेकडे वाढेल. सरकारला यातून मुबलक प्रमाणात फायदा होईल. परंतु या सर्वच गोष्टींची वनवा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत दिसते. डबघाईला आलेल्या बसेस कि माणसे खाजगी वाहनांनी प्रवास करणे पसंत करतात. येणाऱ्या काळात याला आळा घालणे गरजेचे आहे. त्रूटी दूर करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सोनेरी दिवस नक्की येतील.
पर्यायी व्यवस्था
आज पद, प्रतिष्ठा यांच्या विळख्यात माणूस आडकला आहे. गाडी हा एक त्याचा भाग बनला आहे. एक माणूस जायचे म्हटले तरी आज गाडीची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही सर्वं भांडवलदारी व्यवस्थेने बाजारापेठा निर्मिण करतानाच्या चंगळवादी प्रवृत्तीना प्रोहोत्सान दिले आणि माणूस त्याचा बळी ठरला आहे. एकच वेळी सगळेच सायकल वापरणार नाही. लांब पल्याच्या प्रवासासाठी गाड्याचा वापर होईल. परंतु समसंख्येच्या दिवशी समसंख्या असलेल्या नंबरच्याच गाड्या रस्त्यावरून धावतील, तसेच विषम दिवशी विषम संख्येच्याच गाड्या रस्त्यावर धावतील. हा उत्तम असा पर्याय होऊ शकतो. ज्या दिवशी आपल्या गाडीचा नंबर नाही. तेव्हा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर होईल. तसेच आठवड्यातून एकदा “वाहनमुक्त दिन” साजरा करावा. या दिवशी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. परंतु ह्या गोष्टी प्रत्यक्षात येणे गरजेच्या आहेत.
आज मोटारीला पर्यायी म्हणून सायकलीचा वापर जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. कारण एक पदरी रस्त्यावर चार सायकली निश्चितपणे बसतात. तसेच त्यामुळे आपघाताचा गंभीर असा धोका नाही. तसेच पर्यावरणाचे प्रदूषणही रोखण्यास मदत होईल. तसेच मोठ्या प्रमाणात करावी लागणाऱ्या इंधनाची आयात कमी होईल. त्याचा देशाला निश्चितच फायदा होणार आहे. कारण मोटारीचा वेग जास्त असतो. तिला ठराविक अंतर ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी सायकल हा एक उत्तम पर्याय आहे.
तसेच वाहन खरेदी केल्यानंतर ते किती वर्षे वापरावे याला मर्यादा असणे गरजेचे आहे. कारण माणसाचे आयुष्य जसे वाढत जाते,तसे माणूस कमकूवत होत जाते. तसेच गाडीचे पण आहे. गाडीचे वय झाल्यानंतर तिचा आवाज,इंधनाची गरज यामध्ये बदल होतात. जेव्हा जून्या गाडा आपण पाहतो,तेव्हा नवीन गाड्यांच्या तुलनेत त्या जास्त प्रदूषण करतात हे दिसते. त्यासाठी गाडीची कालमर्यादा ठरविणे, त्यानंतर वापरावर बंदी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने विशेष यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. तसेच आज पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत नैसर्गिक वायुवर (C.N.G.) चालणाऱ्या वाहनांमुऴे कमी प्रदूषण होते. त्यामुळे त्यावर जास्त भर देणे गरजेचे आहे. तसेच वीजेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती,सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती काळाची गरज आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
शहरांच्या विकेंद्रीकरणाची गरज
ग्रामीण भागातून शहरांकडे येणारे माणसांचे लोंढे थांबवायचे असतील तर पर्यायी शहरांची जाणीवपूर्वक निर्मिती करावी लागेल. अशा शहरांमध्ये खाजगी वाहनांना वर म्हटल्याप्रमाणे नियम अवलंबावे लागतील. तरच शहरांवरील ताण कमी होऊन वाहतुकीच्या कोंडीवर मार्ग निघू शकेल .तसेच याठिकाणी पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे लागेल. पर्यावरणाची सांगड घालूनच विकासाचे प्रकल्प राबवावे लागतील.
रेल्वेचा विस्तार
देशाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेला आधुनिक सोयीसुविधायुक्त सक्षम करावे लागेल. बुलेट ट्रेन, मेट्रो या भांडवलदार धार्जिण्या फसव्या व मुठभर लोकांचे हित जोपासणाऱ्या योजनाना विरोध करावा लागेल. त्याला पर्याय म्हणून रेल्वेचे लोकल आणि लांब पल्यांच्या मार्ग विस्तारण्याचा आग्रह धरावा लागेल. रेल्वेची स्वच्छता, वेग, जनरल डब्यांची वाढीव संख्या यांसाठी पुढाकार घेणे आवश्यकता आहे.
जनजागृतीची आवश्यकता
भारताच्या भूभागाचा विचार करता मोठ्या प्रमाणात मोटारींची संख्या वाढलेली आहे. त्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वच पहात आहे. त्या दृष्टीने शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणि पर्यावरणाचे गांभिर्य पटवून देणे गरजेचे आहे. मोटारीचे दृष्परिणाम आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम त्यांच्या मनावर बिंबवणे. तसेच शालेय अभ्यासक्रमात पर्यावरणावर विषेश महत्व येणाऱ्या काळात द्यावे लागेल. कारण आज अशा आशयांचा विषय फक्त शेरा मिऴण्यापुरता राहिला आहे. त्याचे गांभिर्यच राहिलेले नाही. जनतेमध्ये शाळेच्या माध्यमातून पथनाट्य, व्याख्याने, वृक्षारोपण, जनजागृती रँली, जनतेचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे.
नवनाथ मोरे
9921976460
Heavy rain : हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार
कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद
रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप