Sunday, December 15, 2024
HomeNewsराहुल गांधींच्या ट्रीम्ड दाढी, कूल लूकचे माध्यमांना कौतुक, पण ते मूळात केंब्रिजमध्ये...

राहुल गांधींच्या ट्रीम्ड दाढी, कूल लूकचे माध्यमांना कौतुक, पण ते मूळात केंब्रिजमध्ये गेलेत का??, ते तिथे करणार काय??, याकडे दुर्लक्ष!!

काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी हे 7 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर गेले आहेत. तेथे त्यांच्या ट्रीम केलेल्या दाढीची आणि कूल लूकची चर्चा माध्यमांनी जोरदार चालवली आहे.किंबहुना राहुल गांधींचे ब्रॅण्डिंग माध्यमांनी केले आहे. पण राहुल गांधी मूळात ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलेत का??, ते तिथे जाऊन काय करणार आहेत??, या विषयीची चर्चा मात्र माध्यमांनी “डाऊन प्ले” केली आहे.

राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने केंब्रिजमध्ये जाणार आहेत. तिथे राहुल गांधींची वेगवेगळ्या विषयावर व्याख्याने होणार आहेत. ते केंब्रिजचे विद्यार्थी असून त्यांनी तिथे 1995 मध्ये एम फिल केल्याचे सांगितले जाते. या आपल्याच माजी विद्यार्थ्याची केंब्रिज विद्यापीठाने लोकशाही, भारत – चीन संबंध, बिग डेटा अशा विषयांवर व्याख्याने ठेवली आहेत.

2022 मध्ये देखील राहुल गांधींनी ब्रिटनमध्ये जाऊन भारतात लोकशाही धोक्यात आल्याचे व्याख्यान दिले होते. तशाच स्वरूपाची व्याख्यानमाला केंब्रिजने पुन्हा ठेवली आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली याविषयी केंब्रिज विद्यापीठाला त्यांचे विशेष कौतुक आहे आणि म्हणूनच त्यांना विशिष्ट विषयांवर व्याख्यानासाठी निमंत्रित केल्याचे ट्विट केंब्रिज विद्यापीठाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केले आहे.

ब्रिटन मधील केंब्रिज असो, वा ऑक्सफर्ड. तिथे नेहमीच वादविवाद मंडळे भारतातील लोकशाहीवर व्याख्यानमाला आयोजित करत असतात. भारतात लोकशाही नसल्याचा निष्कर्ष अनेकदा तिथे अत्यंत उच्चशिक्षित इंग्लिश मधून आणि बौद्धिक चर्चेतून काढला जात असतो. अशाच व्याख्यानमालेत राहुल गांधींचे भारतातील लोकशाही, भारत – चीन संबंध आणि बिग डेटा या विषयावर व्याख्याने होणार आहेत.

याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. भारतात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर लोकशाही उरलेली नाही, हा राहुल गांधींचा आवडता सिद्धांत आहे. भारत – चीन संबंधाबाबत मोदी सरकार चीन पुढे शरणागती पत्करते, असाही राहुल गांधींचा लाडका सिद्धांत आहे. त्यामुळे लोकशाही आणि भारत – चीन संबंध या दोन विषयांवर राहुल गांधी केंब्रिजमध्ये जाऊन काय बोलणार?? आणि केंब्रिज विद्यापीठाला त्यांच्या तोंडून नेमके काय ऐकायचे आहे??, हे समजून घेण्यासाठी फार मोठ्या अभ्यासाची गरज नाही. राहुल गांधी व्याख्यान देणार असलेल्या बिग डेटा या विषयावरती ते काय मांडणी करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीबीसी, ऑक्सफर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ या तिन्ही संस्था भारत, भारतातील लोकशाही, भारताचे आंतरराष्ट्रीय समुदायातील स्थान या विषयावर कोणती मते राखतात?? आणि ते कोणता नॅरेटिव्ह सेट करत असतात??, हे अनुभवांती स्पष्ट झालेच आहे.

पण जे राहुल गांधीं सारखे केंब्रिजचे विद्यार्थी आहेत असे सांगितले जाणारे नेते तिथे जाऊन नेमकी काय मांडणी करणार??, यावर भर देण्यापेक्षा माध्यमांनी त्यांनी ट्रीम केलेली दाढी, त्यांनी बांधलेला टाय, त्यांचा नवा कूल लूक यावर भर देऊन आपली “बौद्धिक पातळी” स्पष्ट दाखविली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय