बीड (ता.२२) : गेल्या कित्येक वर्षांपासून मण्यारवाडी – आंबेसावळी हि बससेवा बंद आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची व नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे. गावापासून ५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या घाटसावळी आणि १० कि.मी. अंतरावर असणाऱ्या ढेकणमोहा येथे विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. मात्र दुर्दैवी बाब ही की, त्या गावातील व आजूबाजूच्या वस्तीवरील विद्यार्थ्यांची घाटसावळी या गावापर्यंत जाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. अक्षरशः विद्यार्थी ५ कि.मी. पायी चालत जातात. या सगळ्या गैरसोयीमुळे कित्येक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही सगळी विद्यार्थ्यांची गैरसोय थांबली पाहिजे आणि तात्काळ बससेवा सुरू झाली पाहिजे अशी भूमिका स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ने घेतली आहे. जर तात्काळ बस सुरू करण्यात आली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसएफआयच्या वतीने देण्यात आला.
कित्येक वर्षांपासून बंद असलेली मण्यारवाडी – आंबेसावळी बससेवा पुन्हा सुरू करावी यासाठी आज विभागीय बस नियंत्रक कार्यालय, बीड येथे विभागीय बस नियंत्रक अधिकारी यांना एसएफआयच्या वतीने निवेदन देण्यात आले. या संदर्भात विभागीय बस नियंत्रक अधिकारी यांच्या समवेत आज चर्चा झाली. डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून आणि रोड सर्वे वैगेरे करून प्रश्न सुटेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या वेळी एसएफआयचे बीड जिल्हा सचिव लहू खारगे, तालुका सचिव अभिषेक शिंदे, तालुका कमिटी सदस्य निखिल शिंदे, आनंद भालेराव, किशोर शिंदे, व्यंकटेश गुंदेकर, विशाल गुंदेकर आदी विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.