भारत सरकारने असंघटित, असुरक्षित कोट्यवधी श्रमिकांचा डाटा बेस तयार करण्यासाठी २६ ऑगस्ट २०२१ रोजी ई-श्रम पोर्टल सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी ही योजना सुरू केली. संपूर्ण देशात ४० कोटीहून जास्त श्रमिक वर्ग विविध क्षेत्रात काम करत आहे. ज्यांची नोंदणी कामगार म्हणून राज्य कामगार विमा योजना (ESIS), प्रॉव्हिडंट फंड (PF) अथवा तत्सम सरकारी दप्तरात नोंदणी झालेली नाही. अशा असंघटित, असुरक्षित ग्रामीण, शहरी कष्टकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन करून त्या सर्व गोरगरीब लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, कामगार मंत्रालय, समाज कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ई श्रम पोर्टलवर(eshram.gov.in) ही नोंदणी करता येणे सोपे झाले आहे. आता पर्यंत देशातील असंघटित ४ कोटी ६७ लाख श्रमिकांनी नोंदणी केलेली आहे. आधारकार्ड, पॅन कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड सारखे हे प्रमाणित ई श्रमकार्ड आहे. भारत सरकारच्या संकेत स्थळावर ही नोंदणी विनाशुल्क करता येते.
ई-श्रम कार्ड कोण बनवू शकते.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने या मजुरांसाठी जारी केलेले १२ अंकांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि ई श्रम कार्ड अधिकृत पणे मान्य असेल. देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना नवी वेगळी ओळख मिळेल, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डाचा उपयोग होईल. देशात विविध प्रकारची कामे लोक करत असतात. शेतमजूर, वीटभट्टी कामगार, फळे भाजी विक्रेता, प्रवासी मजूर, हमाल, दुधाचा जोडधंदा करणारा, मच्छिमार, लाकूड तोडणी-कतारी कामगार, बांधकाम मजूर, चामडे उद्योग, रंगारी, न्हावी, फेरीवाला, रिक्षा ऑटो चालक, वृत्तपत्र विक्रेता, प्लॅम्बर, टपरीवाला, अंगमेहनती श्रमिक, मनरेगा, रोजगार हमी कामगार, घरेलू महिला कामगार, रेशीम उत्पादन कामगार, ई विविध क्षेत्रात पोटार्थी श्रमिकांची नोंदणी मोबाईल द्वारे नोंदणी करता येईल.
देशातील सामाजिक, सेवाभावी संस्था संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी अशा श्रमिकांची नोंदणी करण्यासाठी भारत सरकारला साहाय्य केल्यास गोरगरिबांचा फायदा होईल.
काय आहे ई-श्रम पोर्टल (e-SHRAM Portal)
देशाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे श्रमिक नोंदणीचे पारदर्शक पोर्टल प्रथमच केंद्र सरकारने बनवले आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत मजुरास दोन लाख रुपयांचा अक्सिडेंटल इन्शुरन्स मिळेल. एक वर्षाचा प्रीमियम सरकार भरणार आहे. अपघाती मृत्यू अथवा कायम स्वरूपी अपंगत्व आले तर २ लाख रुपये आणि आंशिक अपंगत्वाचे १ लाख रुपये मिळतील. सरकारच्या विविध सामाजिक योजना राबवताना सरकारी कार्यालयामध्ये विविध दाखले मागितले जातात आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. भारत सरकारने आधारकार्ड योजना यशस्वी करून नागरिक म्हणून प्रत्येकाला ओळख मिळवून दिली आहे.
या ई-श्रम कार्डचे नाव युनिक आयडेंटिफिकेशन नंबर कार्ड आहे आणि ज्या प्राधिकरणाखाली हे कार्ड येते त्याचे नाव – श्रम आणि रोजगार मंत्रालय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील कामगार आणि मजुरांसाठी आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने अलीकडेच भारतभरातील अपरिचित क्षेत्रातील कामगार आणि कामगारांविषयी संपूर्ण माहिती गोळा केली आहे. तुम्ही हे यूएएन कार्ड आयुष्यभर वापरू शकता.
देशातील अपरिचित सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई-श्रम पोर्टल
देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. जर तुम्ही श्रम किंवा रोजगारासाठी या पोर्टलवर तुमची नोंदणी केली तर तुम्हाला UAN E Sharmaik कार्ड दिले जाईल. तुम्ही या पोर्टलवर फक्त CSC सेवा केंद्राद्वारे नोंदणी करू शकता आणि त्यासाठी तुम्ही मोफत अर्ज करू शकता. नाव, व्यवसाय, पत्त्याचा पुरावा, कौटुंबिक तपशील, शैक्षणिक पात्रता, कौशल्य तपशील, आधार कार्ड, रेशन जन्म प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक (आधार कार्डशी जोडलेले), बँक पासबुक, वीज बिल इत्यादी पूरक माहितीसह ऑनलाईन नोंदणी करता येते.
– क्रांतिकुमार कडुलकर
-पिंपरी चिंचवड