Thursday, February 6, 2025

सुरगाणा तालुक्यातील काही गावांना भूकंप सदृश हादरे, जिव मुठीत धरून जगतात नागरिक

“गावात पक्कं हादंर बसतय मनात धाकधूक हुयते.. काय होताय न काय.. जो-यात दणका बसला तर काय करावं नाय.. सरकारने येवा खरा काय ती सांगावा..” ग्रामस्थांमध्ये रोजच रंगतेय चर्चा..

खोकरविहीर, चिंचपाडा, चि-याचापाडा गावात भूकंप सदृश्य सौम्य हादरे… ग्रामस्थांमध्ये घबराट, जिव मुठीत धरून रात्री काढतात झोप…

सुरगाणा, ता.२३ (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील अंबोडे जवळील खोकरविहर, चिंचपाडा, खोकरविहीर, चिऱ्याचापाडा या गावात चार ते पाच दिवसांपासून भूकंप सदृश हादरे बसत आहेत. ऑक्टोबर ता. २१ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान फायर उडविल्या सारखा जोरात आवाज आला तर संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास मांडणी वरील ठेवलेल्या भांड्याचा आवाज गावभर आल्याने नागरिकांमध्ये भूकंपाचे हादरे तर नाही ना अशी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. काही वेळा कौलांचा आवाज येतो.

याबाबत ग्रामस्थ एकनाथ गांगोडे यांनी सांगितले की, असे आवाज नेहमीच गावात येतात आठ दिवसांपूर्वी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ वाजता असाच आवाज आला होता. त्यावेळी घर हलले सारखा भास झाला होता. तर १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता गावभर भांड्याचा आवाज आला होता. ता.२२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५५ वाजता सौम्य धक्का बसला. दुसरा १.३० वाजता तर ६.४८ वाजता संध्याकाळी जोरात आवाज झाला असल्याचे  एकनाथ गांगोडे यांनी सांगितले.

“अनेक वेळा असे आवाज येत असतात. आज झालेल्या आवाजाची तीव्रता अधिक जाणवली. बार झाल्यासारखा आवाज येतो. आता तर कुठेही विहिरीचे काम सुरु नाही. भांड्याचा आवाज येतो. जमीनीतून आवाज आल्याचे जाणवते. अचानक आवाज झाला तर माणूस दचकून उठतो बाहेर निघून बघितले तर काहींच दिसत नाही. याचा नाद प्रतिध्वनी दवाखान्यात घुमतो. याबाबत ग्रामस्थ सकाळी एकमेकांशी चर्चा करतात. नेहमीप्रमाणे कामाला लागतात. मात्र नेमका हा आवाज का येतो याबाबतची शहानिशा करून आमची भीती शासनाने दुर करावी.” 

– एकनाथ गांगोडे, ग्रामस्थ खोकरविहीर

खोकरविहिर, चि-याचापाडा, चिंचपाडा या गावात ता. २१ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान जोरात आवाज आला तर संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास घरात ठेवलेल्या भांड्याचा आपोआप आवाज झाला. हे भूकंपाचे हादरे असावे असे ग्रामस्थांनी सांगितले. काल झालेल्या आवाजाची तीव्रता अधिक जाणवली. अचानक हा आवाज का येतो याबाबतची शहानिशा करून आमची भीती शासनाने दुर करावी अशी ग्रामस्थांनी मागणी आहे. तहसिल कार्यालयात आज अहवाल सादर केला आहे”

– ज्ञानेश्वर पगार, तलाठी खोकरविहीर

“खोकरविहीर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही. याबाबत भूकंप मापक यंत्रणा नाशिक तसेच नैसर्गिक आपत्ती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या प्रशासनाशी संपर्क केला आहे. शासन तुमच्या पाठीशी सदैव आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. याबाबत लवकरच भूकंप मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.”

– राजेंद्र मोरे, तहसिलदार सुरगाणा

दोन वर्षांपूर्वी गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर चामोलीचा माळ येथील जमीनीला दोनशे ते अडीचशे फुटा पर्यंत उभी भेग (चीर) पडून जमीन खचली होती. याबाबत नेमके काय हा प्रकार आहे याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ एकनाथ गांगोडे, देविदास पाडवी, निवृती बा-हे, नामदेव जाधव, गंगाराम बा-हे, गंगाराम गांगोडे, मधुकर वार्डे, एकनाथ बा-हे, जानकी बा-हे, योगीराज गवळी यांनी केली आहे. याबाबत नैसर्गिक आपत्ती विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles