Thursday, February 13, 2025

PCMC : लोकाभिमुख नियोजन असलेले दिल्ली मॉडेल राबवू – चेतन बेंद्रे

आम आदमी पार्टीचा 11 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : जनतेच्या सहभागाने निर्माण झालेल्या आणि जनतेचे कल्याण करणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ चा 11 वा वर्धापन दिन आणि ‘संविधान दिन सोहळा’ मोरवाडी, पिंपरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संविधानाला अभिप्रेत असलेले मोफत शिक्षण व मोफत आरोग्य सुविधा, अखंडीत वीजपुरवठा, आवास योजना ईई अनेक प्रकारच्या आशा आकांक्षा शहरातील जनतेच्या आहेत. देशात ‘आप’चे दिल्लीचे मॉडेल संपूर्ण देशात आदर्श ठरले आहे.

आम आदमी पार्टी जनतेच्या हितासाठी जन आंदोलनातून जन्माला आली आहे. धनशक्तीतून धंदेवाईक राजकारणी तयार होतात, आणि करदात्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. येथील जनतेने मागील दोन दशकातील प्रस्थापित पक्षांचा कारभार अनुभवला आहे. आम्हाला स्मार्ट सिटी साठी आवश्यक सुविधा देताना अखंडीत वीजपुरवठा, नियमित पाणी पुरवठा, मोफत आरोग्य सेवा, मोफत शिक्षण याला प्राधान्य दिले जाईल. पालिकेच्या एकूण दरवर्षीच्या सुमारे 6 हजार कोटींच्या बजेटमधील प्रत्येक रुपयाचा मोबदला करदात्यांना देणे हेच आमचे व्हिजन मिशन आहे, असे आश्वासन ‘आप’ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी पार्टीच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात नागरिकांना दिले.

नुकताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शिक्षकाचे एक शिष्टमंडळ केजरीवाल सरकारचे सरकारी शाळेचे दिल्ली मॉडल पाहण्यासाठी गेले होते. ही एक आपचा कार्यकर्ता म्हणून आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, परंतु दिल्ली मॉडल राबवण्यासाठी दिल्ली दौऱ्याची गरज नाही तर इच्छाशक्तीची गरज आहे, पिंपरी चिंचवड करांना सुद्धा दिल्लीप्रमाणे मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, मोफत बससेवा मिळावी असे मत यावेळी स्वप्निल जेवळे यांनी भाषणामध्ये मांडले.

सध्याचे राज्य सरकार हे मराठा आरक्षणाबाबत वेळ काढू भूमिका घेत आहे. तरी, सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीमध्ये बसवून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी कपिल मोरे यांनी मांडले.

तसेच सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपच्या लोक कल्याणकारी योजनांची गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, असे मत वैजनाथ शिरसाट यांनी व्यक्त केले.

पक्षाच्या ध्येय धोरणासाठी व पिंपरी चिंचवड मध्ये आम आदमी पक्षाची महापालिकेमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचा प्रण ह्यावेळी घेण्यात आला. सभे नंतर मोरवाडी ते पिंपरी चौका पर्यंत पदयात्रा काढण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले.

आजच्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान पक्षाचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी भूषविले. संविधान उद्देशिकाचे वाचन पक्षाचे महासचिव राजभाई चाकणे यांनी केले. संविधानाचे महत्त्व आपल्या भाषणामार्फत गोविंद माळी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अशोक लांडगे, रशिद अख्तर, सरोज कदम, कपिल मोरे, वैजनाथ शिरसाट, चंद्रमणी जावळे, स्वप्नील जेवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन यशवंत कांबळे व सचिन पवार यांनी केले. आभार प्रदर्शन ब्रह्मानंद जाधव यांनी केले. ह्यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील मोनिका बंगाळे (मराठी सिने अभिनेत्री), नीताताई हुले (मा. सरपंच), बी. आर. माडगूळकर (ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष), गिरीश नेटके (सामाजिक कार्यकर्ते), डॉ. प्रशांत खाडे (सामाजिक कार्यकर्ते), ह भ प बाळासाहेब गुळवे महाराज, ह भ प नामदेवराव मेमाने, कुंडलिक ढगे (सामाजिक कार्यकर्ते), डॉ. मीनल, नारायण भोसले (संचालक – शिवशक्ती पतसंस्था), अखिल शेख (सामाजिक कार्यकर्ते) आदी मान्यवरांचे सत्कार अध्यक्ष चेतन बेंद्रे, उपाध्यक्ष अशोक लांडगे, उपाध्यक्ष राशीद अत्तार, उपाध्यक्ष संदीप देवरे, महिला अध्यक्ष सरोज कदम, महासचिव राज चाकणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अनेक पक्षप्रवेश सुद्धा झाले त्यांचा पक्ष प्रवेश संघटन मंत्री ब्रह्मानंद जाधव, वाजिद शेख व सचिन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles