लखनऊ : उत्तरप्रदेश पुन्हा हदरले असून माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना पुन्हा एकदा घडली आहे. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सामुहिक बलात्काराच्या एका अमानवी अशा घटनेने हादरला आहे.
दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणाची आठवण करून देणारी ही घटना उत्तर प्रदेश मधील बदायू जिल्ह्यामध्ये घडलीय. एका मध्यमवयीन महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं आहे. याबाबतची तक्रार बदायू जिल्ह्यातील उघैती या छोट्या गावातील पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या रविवारी संध्याकाळी मंदिरात गेली होती. मात्र, ती परतलीच नाही. गावातील स्थानिकांनी सांगितले आहे की, रात्री 12 च्या सुमारास या रक्तबंबाळ अवस्थेतील पीडितेला टाकून दोन इसमांसहित असलेल्या एका कार चालकाने पोबारा केला. त्याच मध्यरात्री तिचं निधन झालं.
प्राथमिक तपासखत स्पष्ट झालं की या घटनेतील आरोपींनी तिला कारमधून चंदौसी येथे उपचारांसाठी नेलं होतं. या घटनेतील पीडितेच्या नातेवाईकांनी आरोप केलाय की, तक्रार दाखल करुनही उघैती पोलिस स्टेशनचे ऑफिसर रविंद्र प्रताप सिंह हे वेळेवर पोहोचले नाहीत. या पीडितेचा मृतदेह मृत्यूनंतर तब्बल 18 तासांनी म्हणजे सोमवारी दुपारी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
मंगळवारी आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, या पीडितेच्या गुप्तांगांच्या ठिकाणी अनेक जखमा आढळून आल्या आहेत. या महिलेची बरकडी तसेच पाय मोडला होता. तसेच तिच्या फुप्फुसावर जोरदार हल्ला करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी याबाबत सामुहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी चार जणांची टीम बनवली आहे.
या घटनेतील संशयित आरोपी महंत बाबा सत्यनारायण, त्याचा सहाय्यक वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल यांचा शोध सुरु आहे. अद्याप एकालाही अटक झालेली नाही.