घोडेगाव : थोर स्वातंत्र्य सेनानी, प्रतिसरकारचे निर्माते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती किसान सभेच्या वतीने,आंबेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये साजरी करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर होते व स्वातंत्र्योत्तर काळातील एक लढावू नेते होते.
महाराष्ट्रात प्रामुख्याने,जुन्या सातारा जिल्ह्यात व आत्ताच्या सातारा – सांगली जिल्ह्यात, स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग राबवणारे ते अत्यंत लढावू व धाडसी असे नेते होते. कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने लोकसभेत ते खासदार म्हणून भरघोस मताने निवडून गेले होते. संसदेत ते मराठी भाषण करणारे पहिले खासदार होते. याबरोबरच, अखिल भारतीय किसान सभेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष ही राहिलेले होते.
क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यातील तेरुंगन, फलोदे, तळेघर, बोरघर, घोडेगाव, आदी गावात किसान सभेच्या गाव समित्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन केले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी, श्रमिक, शेतमजूर व एकूणच देशातील वंचित समुदाय यांच्या हितासाठी अविरत कार्य केले आहे. त्यांच्या विचारांचा व लढावू कृतीचा वारसा किसान सभा ताकदीने पुढे नेत आहे. आंबेगाव तालुका किसान सभा यापुढे ही शेतकरी, श्रमिक, आदिवासी समुदाय यांच्या हितासाठी, लोकशाही मार्गाने, सातत्याने चिवट लढा देत राहील असा निर्धार गावागावात केला गेला अशी माहिती यावेळी किसान सभेचे तालुका कार्यध्यक्ष बाळू काठे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे संयोजन किसान सभेचे जिल्ह्याचे नेते अशोक पेकारी, राजू घोडे, कृष्णा वडेकर, तालुका कार्यध्यक्ष बाळू काठे, तालुका सचिव रामदास लोहकरे, तालुका कार्यकारणी सदस्य अशोक जोशी, दत्ता किरंगे, लक्ष्मण मावळे, सुभाष भोकटे, नंदाताई मोरमारे, अर्जुन काळे यांनी केले होते.