जुन्नर : मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी किसान सभेच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यासाठी संयुक्त बैठकीची मागणी देखील करण्यात आल्याची माहिती किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी व गणपत घोडे यांनी दिली.
जुन्नर तालुक्यामध्ये मनरेगाच्या कामांमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. विशेषतः अनेक गावांमध्ये रोजगार हमीच्या कामाची मागणी असून सुद्धा काम उपलब्ध झालेले नाही. या अगोदर किसान सभेच्या पुढाकारातून अनेक गावांमध्ये रोजगार हमीची कामे यशस्वीपणे पार पडली होती. या वर्षी सुद्धा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमीच्या कामांची अत्यंत गरज आहे. म्हणून रोजगार हमीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी व या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रांत महोदय यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा संघटनेचे कार्यकर्ते यांच्या सोबत संयुक्त बैठक घेऊन मनरेगाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर किसान सभा जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, अध्यक्ष माधुरी कोरडे, कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबळे, सदस्य गणपत घोडे, शंकर माळी, नारायण वायाळ, संदिप शेळकेंदे, मुकुंद घोडे यांची नावे आहेत.