आंबेजोगाई : आंबेजोगाई तहसील कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक विमा अतिरिक्त ऊस तसेच 25% थकलेले अनुदान या प्रश्नावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी अजय बुरांडे मोर्चाला संबोधित करताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने पीक विम्याच्या प्रश्नावर मागील तीन वर्षापासून तहसील, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त व कृषी मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केलेला आहे. तसेच झालेल्या आंदोलनामुळे सन 2018 चा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तसेच किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या पिकविमा दिंडीमुळे 2021चा अग्रीम विमाचा पहिला हप्ता मिळाला आहे. याहीपुढे 2020 चा पिक विमा व 2021 चा पिक विमा नुकसानीच्या प्रमाणात सरसकट सर्व शेतकर्यांना तातडीने जमा केला पाहिजे. यावर्षीच्या अतिवृष्टी अनुदानाचा 25 टक्के रकमेचा राहिलेला दुसरा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याशिवाय किसान सभा स्वस्थ बसणार नाही, असे बुरांडे म्हणाले.
तसेच जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचे लवकरात लवकर गाळप करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करावे उभे असणाऱ्या ऊसाची पंचनामे करून मोठ्या प्रमाणात उभा असणारा पाऊस कार्यक्षेत्र बाहेर नेऊन ऊस गाळप करावा यासाठी लागणारा वाहतुकीचा भार शेतकऱ्यावर न लादता शासनाने सोसावा व वेळेत एफआरपी नुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा करावी. या सोबतच योग्य दाबाने किमान आठ तास अखंडितपणे शेतीसाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा. शेतकर्यांचे कंबरडे मोडणारी रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, या देखील मागण्या करण्यात आल्या.
त्यावर तहसील प्रशासनाने मागणीला तात्काळ प्रतिसाद देत कारखान्याचे सीईओ व किसान सभेच्या शिष्टमंडळाबरोबर नऊ मार्चला बैठक घेण्याचे मान्य केले आहे.
यावेळी बीड जिल्हा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, उत्तरेश्वर इंगोले, प्रशांत मस्के, उत्तरेश्वर इंगोले, दिनेश शेप, रवी देवरवाडे, जगन्नाथ घाळे, दत्तात्रेय नेवल, विष्णू जाधव, राहुल हाके, आनंद केंद्रे, सौदागर कदम, अशोक शेळके, योगीराज गडदे, सुहास चंदनशिव सह मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.