जुन्नर : जुन्नर तालुक्यात बिबट सफारी प्रकल्प झाल्यास पर्यटनास व उद्योग व व्यवसायास चालना मिळेल. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांनी दुरद्रुष्टी ठेऊन हा प्रकल्प या तालुक्यात आणला आहे आणि त्यासाठी त्यांचा पाठपुरावा करण्याचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जेष्ठ नेते रवींद मिर्लेकर चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे केले.
जुन्नर तालुक्यात बिबट सफारी व्हावी या मागणीसाठी जुन्नरचे माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी जुन्नर येथे उपोषण केले होते, या उपोषणादरम्यान त्यांची तब्बेत खालावली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल केले होते, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी रवींद मिर्लेकर यांनी त्यांच्या रायगड निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके, शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, गणेश कवडे, जुन्नर तालुका संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे शिवसेना उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिर्लेकर म्हणाले की, “जुन्नर तालुक्यात दूर्बिन केंद्र आहे त्यामुळे या ठिकाणी औद्योगिक वसाहत होऊ शकत नाही. तसेच जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी बिबट सफारी व्हावी ही संकल्पना शरद सोनवणे यांनी मांडली. परंतु त्याचा पाठपुरावा योग्य त-हेने होत नसल्यामुळे जनतेच्या मागणीसाठी या प्रकल्पास चालना देण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांनी स्व:पक्षाचे सरकार असतानाही आंदोलन केले त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये जागृता निर्माण झाली व तरुणांमध्ये संवेदना निर्माण झाली, ती फार सकारात्मक पद्धतीने सरकारने मनावर घेतली आहे. बिबटे जास्त झाले म्हणून त्यांना बंदिस्त ठेवण्यासाठी हा प्रकल्प नाही तर पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प असल्याचे मिर्लेकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले की, “बिबट सफारी हा जुन्नरच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि जुन्नरच्या अस्मितेसाठी आपण संघर्ष करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत तसेच रवींद मिर्लेकर यांचे आभार मानले.