Saturday, July 6, 2024
Homeराज्यअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा २० फेब्रुवारी पासून बेमुदत संप; "या" आहेत मागण्या 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा २० फेब्रुवारी पासून बेमुदत संप; “या” आहेत मागण्या 

पुणे : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामध्ये अंगणवाड्या बंद करून संपूर्ण कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या शुभा शमीम यांनी दिली.

शुभा शमीम म्हणाल्या, राज्य शासनाने आपले मानधन वाढवले, त्याला साडेपाच वर्षे उलटून गेली. केंद्र सरकारने वाढवल्याला साडेचार वर्षांचा काळ लोटला. दरम्यान आपण आपली सर्व कर्तव्ये तर पार पाडलीच पण कोरोना हटवण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतले. पण त्याचे फळ काय मिळाले? 

महागाई दुप्पटीने वाढली पण मानधनात वाढ नाही, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ नाही, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ नाही, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील गायब केल्या. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने जुना मोबाईल भंगारात जायच्या लायकीचा होऊनही, आपण वर्षभरापासून नवीन मोबाईलसाठी आंदोलन करूनही नवीन मोबाईल दिलेला नाही. इंग्रजी भाषेतील सदोष पोषण ट्रॅकर ॲप आपल्यावर लादला. आपल्या खाजगी मोबाईलवरून, जमत नसेल तर इतरांना वेठीला धरून तो भरायला भाग पाडले, उच्च न्यायालयाचे आदेश देखील धाब्यावर बसवले. न्यायालयाचे आदेश झुगारून आपला प्रचंड छळ केला, धमक्या दिल्या, असेही शुभा शमीम यांनी सांगितले. 

सरकारने तारखांवर तारखा देत खोटी आश्वासने दिली. कृती समितीने आता रणशिंग फुंकले आहे. २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर जाणार आहोत. अंगणवाड्या बंद, सर्व कामकाज बंद. पोषण ट्रॅकर तर भरणारच नाही, पण अहवाल आणि माहिती पण देणार नाही. आता घरात बसून रहायचे नाही, रस्त्यावर उतरून लढायचे, हा आपला निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम.ए.पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

• आंदोलनाचा कृती कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

1. १ फेब्रुवारीला राज्य शासन आणि प्रशासनाला संपाची नोटीस बजावली जाईल.

2. २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू होणार

3. प्रकल्प, जिल्हा, राज्य स्तरावर सातत्याने आंदोलने केली जाणार

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय