पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ – १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या “नारायण पेठ” मध्ये पूर्वीच्या मांगवाड्यात एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते.
५ नोव्हेंबर १८१७ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले.दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले.
त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली.
इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.लहुजी साळवे यांचे कार्य शिक्षणांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे.सावित्रीबाई फुले यांना उच्च वर्गातील माणसे त्रास देत होती तेव्हा लहुजी साळवे हे सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.अशाप्रकारे लहुजी साळवे हे स्वातंत्र्य चळवळ व समाजसुधारनाच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले आयुष्य देशासाठी खर्ची केले अशा थोर क्रांतिकारकांचे नाव राष्ट्रीय महापुरुषाच्या यादीत असणे गरजेचे आहे.तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ह्या निवेदनाद्वारी क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे नावे राष्ट्रीय महापुरुषांच्या यादीत समाविष्ठ करण्यात यावे अशी मागणी डॉ.धनंजय भिसे,अध्यक्ष,मातंग साहित्य परिषद यांनी केली आहे.
---Advertisement---
---Advertisement---
क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे यांचे नावे राष्ट्रीय महापुरुषाच्या यादीत समाविष्ठ करा- धनंजय भिसे
---Advertisement---
- Advertisement -