Photo : Facebook |
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात सातत्याने शिक्षकांची जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली जात आहे. शिक्षकांच्या या जुन्या पेन्शन योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
पनवेल मध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद व वार्षिक अधिवेशन पार पडले. यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात आता कुठेही गेलो तर माझ्या हातात शासकीय व शैक्षणिक कर्मचाऱ्यांकडून निवेदन मिळतं. त्यात जुन्या पेन्शनचा प्रश्न सर्वात जास्त असतो आणि हा प्रश्न निकाली काढावा अशी तुमची इच्छा आहे. या पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. मी स्वत : राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे.
पुढे ते म्हणाले, १९७८ च्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला. त्याप्रमाणेच मला खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा केंद्रप्रमुख निवड, कोविड कर्तव्यात मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचं विमाकवच आणि सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, २४ वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी, हे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत. मंत्रिमंडळासोबत होणाऱ्या बैठकीत शिक्षकसंघातील दोन – तीन प्रतिनिधी यांनाही आपण समाविष्ट करून घेऊ, असे शरद पवार म्हणाले.
तसेच, मागील दोन वर्षापासून वारंवार संकटे येत आहेत, त्यामुळे काही मागण्या मान्य होऊ शकल्या नाहीत आणि आर्थिक स्थिती बिकट आहे, असेही शरद पवार म्हणाले. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.