पिंपरी / किशोर थोरात : रासायनिक खतांचा अति वापर,बदलते तापमान यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आहे. जल संधारण आणि मृदु संधारण न केल्यास जगातील भविष्यात ४० टक्के नागरीकांना अन्न मिळणार नाही. यामुळे सर्वच राजकारण्यांनी याकडे एक राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.असे मत आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ़ पिंपरी एलिटच्या वतीने पोपटराव पवार यांना सर्व्हिस एक्सलन्स पुरस्कार व सायकलपट्टू डॉ. निरूपमा भावे यांना व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार संस्थेच्या दुसऱ्या स्थापना दिनाच्या दिवशी देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी माजी प्रांतपाल शैलेश पालेकर,रोटरी क्लब पिंपरी एलिटचे अध्यक्ष अशोक शिंदे,सचिव सुनील होळ,पब्लिक इमेज संचालक शीतल अर्जुनवाडकर, डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रसिद्धी प्रमुख वसंतराव माळूंजकर, सभासद् संचालक नितीन ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इतिहासकार डॉ नामदेवराव जाधव यांना रोटरी पिंपरी एलिटचे मानद सभासदत्व बहाल करण्यात आले.
श्री पवार पुढे म्हणाले कि,अस्थिर सरकार आल्यास मूलभूत समस्या बाजूलाच राहतात. मात्र सर्व राजकारण्यांनी एकत्र येवून या राष्ट्रीय आपत्तीच्या दृष्टीकोनाने पहावे. माणसाकडे पैसा आला कि संस्कारापासून दूर जातो. श्रीमंतीला संस्काराची गरज आहे. गांधींनी सांगितले कि खेड्याकडे चला, मात्रा आज गावकरी मंडळी शहरात येत आहे. यामुळे खेडेच्या खेडे ओस पडले आहेत. खेड्यात ग्रामस्थ उरले नाही, संवाद राहिला नाही. अशा परिस्थितीत गावांचे अस्तित्व राहील कि नाही. अशी शंका येते. केंद्र सरकारने खेड्यांकडे अधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
खेड्यांचा निधी शहराकडे जातो एवढेच नाही तर धरणांचे तोंड देखील शहराकडे वळले आहे. सर्व सुविधा शहरी भागाकडे जात आहेत. माजी प्रांतपाल शैलेश पालेकर यांनी आपल्या भाषणात अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले व रोटरीच्या हैप्पी विलेज प्रकल्पासाठी पोपटराव पवार साहेबांनी केलेले मार्गदर्शन दिशादर्शक ठरेल. या कार्यक्रमात क्लबच्या उभारणीसाठी योगदान दिलेल्या माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीशा तांबे व रुची गांधी यांनी केले तर आभार नियोजित अध्यक्ष महादेव शेंडकर यांनी केले.


