मच्छीमारांच्या समस्या सरकारने सोडवण्याची मागणी
दापोली, ता.२३ : मच्छीमार संघर्ष समिती दापोली मंडणगड गुहागर तर्फे आज २३ ऑक्टोबर रोजी मच्छीमारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हर्णे बंदर बंद ठेवण्यात आले.
आज हर्णे बंदर येथे मच्छीमार संघर्ष समितीची सभा घेण्यात आली. सभेत अनेक मच्छीमार व्यवसायिक उपस्थित होते. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ झाल्यामुळे बोटीला डिझेल परवडत नाही. तसेच मासेमारी व्यवसायात उधारीने व्यवहार केले जातात. उधारी थकीत राहिल्यामुळे मासेमारी व्यवसायात फार अडचणी येतात. म्हणून मासेमारी व्यवसाय हा रोखीनेच झाला पाहिजे. मच्छीमारांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्यांकडे लोकांचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज हर्णे बंदर बंद ठेवण्यात आले.
बरेच वर्षापासून आम्ही जेटीची मागणी शासनाकडे करीत आहेत. अनेकवेळा शासनाला निवेदन दिली व त्याचा पाठपुरावा केला तरीही हर्णे बंदरात जेटीची सोय झालेली नाही. जेटीची सोय झाल्यावर हर्णे बंदराच्या अनेक समस्या सुटतील. म्हणून हर्णे बंदरात जेटीची सोय शासनाने लवकरात लवकर करावी, अशी प्रतिक्रिया दापोली मंडणगड गुहागर मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग चोगले यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश रघूवीर, कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावशे तसेच इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या ठिकाणी अनेक पर्यटक माशांचा लिलाव बघायला व मासे विकत घ्यायला हर्णे बंदरावर येतात. मात्र मच्छीमारांनी बंद पुकारल्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. यावेळी सरकारने मच्छीमारांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी मच्छिमारांनी केली.