नागपूर : फेरीवाला हा पुरातन काळापासून आपली उपजिविका करत आहे, गावाची शहरे झाली या शहरांच्या विकासाला विरोध नाही मात्र फेरीवाल्यांना शहरांमध्ये सामावून घेऊन त्यांना सन्मानाने परवाने, हॉकर्स झोंन द्यावेत ते मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असे मत महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन तर्फे नागपूर येथे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली, त्यानंतर मंगळवारी बाजार याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रीय युवा अध्यक्ष मैकेंजी डाबरे, सचिव विनीता बाळेकुंद्री, अध्यक्ष जम्मू आनंद, अखिलेश गौड़, सल्लागार राजु भिसे, कविता धीर यांच्यासह महाराष्ट्र पदाधिकारी, नागपूर आणि विदर्भातील पथ विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे नखाते म्हणाले की, केंद्र शासनाने २०१४ ला कायदा केला तेंव्हा पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणीसाठी फेडरेशन आणी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ प्रयत्न करीत आहे, काही प्रमाणात काही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी झाली, उर्वरित ठिकाणी करून घेण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणी प्रयत्न करणार असून जेथे निवेदन, आंदोलने आणि प्रसंगी न्यायालयाची भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडण्यासाठी नागपूर येथे मंत्री व आमदारांना भेटून त्यांना निवेदन देऊन पुढील प्रक्रिया लवकर घ्यावी असा ठराव कार्यकारणीत घेण्यात आला.
जम्मु आनंद यांनी फेरीवाला हा कोणाची अपेक्षा न करता स्वतः व्यावसाय निर्मिती करतो त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. विनीता यांनी मुंबईसह अनेक ठिकाणची परिस्थिती मांडली. सर्वेक्षण अर्धवट आहे ते पुर्ण करावे आणि अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नसावी अशी मागणी त्यांनी केली. प्रस्ताविक माजी अध्यक्ष शिरिष फुलझेले यांनी केले तर आभार किरण बोबडे यांनी मानले.