घोडेगाव : बाळहिरड्याची खरेदी शासनाने त्वरित सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भातील निवेदन आंबेगाव तालुका किसान सभेच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव चे प्रकल्प अधिकारी यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे उपस्थित होते.
तसेच किसान सभेच्या वतीने मागण्यांच्या सोडवणुकीसाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन दि.30 मे 2022 रोजी प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथे केले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील बाळहिरडा या गौण वनउपजाची, खरेदी वर्षानुवर्षे आदिवासी विकास महामंडळ करत असे. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांची पिळवणूक कमी होऊन त्यांना काही प्रमाणात का होईना आपली उपजीविका सुरक्षित करण्यास मोठे साहाय्य मिळत असे. परंतु मागील तीन ते चार वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळ यांनी बाळहिरडा खरेदी करणे थांबवले आहे. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांनी बाळ हिरड्याचे भाव कमालीचे पाडले असून आदिवासींचे प्रचंड मोठे शोषण यातून सुरू आहे, असेही किसान सभेने म्हटले आहे.
आदिवासी भागातील नागरिकांना मुख्य उत्पनाचे साधन बाळहिरडा हेच असून याची खरेदी करणे शासनाने थांबवले आहे, हे अत्यंत अन्यायकारक आहे. याचबरोबर, निसर्ग चक्रीवादळात बाळहिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यावेळी शासनाने पंचनामे केले होते. परंतु ही नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी, अशी ही मागणी किसान सभेने केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
यावेळी प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास महामंडळ यांचे अधिकारी व संघटनेचे शिष्टमंडळ यांची एकत्रित बैठक आयोजित करून या प्रश्नांच्या सोडवणूकसाठी एकत्रित प्रयत्न व्हावेत, अशी मागणी किसान सभेने केली आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रशासनांकडून प्रयत्न न झाल्यास संघटना पुढील काळात अधिक तीव्रपणे आंदोलन उभे करणार आहे, असा इशारा ही या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे, आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे व तालुका सचिव अशोक पेकारी यांची नावे आहेत.
ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी
Video : जुन्नरच्या “या” परिसरात आढळला गवा, पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाज