नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेत्यांनी याबाबतची शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत याबदल माहिती दिली. भाजपने 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. या यादीत देशाच्या 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
या सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्येलाही लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. तसेच कोटा मतदारसंघातून ओम बिर्ला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एटा येथून राजवीर सिंह, अमेठी येथून स्मृती इरानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये 28 महिला, 50 पेक्षा कमी वयाचे 47 युवा उमेदवार, अनुसूचित जाती 27, अनुसूचित जनजाती 18, ओबीसी 57 अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आलं आहे”, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.
दरम्यान, पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रात कुणाकुणाला तिकिटे मिळणार याबाबत मोठा सस्पेन्स वाढला आहे.