पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता, याबाबतचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले होते, या निर्णयास आता विद्यापीठ प्रशासनाने स्थगिती दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एसपीपीयू ऑक्सी पार्क ही योजना जाहीर केली होती. त्याअंतर्गत विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी प्रवेश करण्यासाठी मासिक शुल्क १ हजार रुपये, सहामाही शुल्क ५ हजार ५०० व वार्षिक शुल्क दहा हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेतला होता. हे शुल्क भरणाऱ्यांना ओळखपत्र देखील देण्यात येणार होते, मात्र या निर्णयानंतर विद्यार्थी संघटनांसह विविध स्थरातून विरोधात केला जात होता.
मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एसपीपीयू ऑक्सी पार्क’ या योजनेमध्ये क्रीडा व इतर सुविधा समाविष्ट करून आणखी व्यापक करण्याच्या दृष्टीने पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे कारण देत काही तासातच या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.