कुणासाठी ती आनंदाची पर्वणी असते, कुणासाठी ती सुट्टीतील मजामस्ती असते, कुणासाठी ती फटाक्यांची आतिषबाजी असते, कुणासाठी ती फराळ व मिठाईची रेलचेल असते, कुणासाठी ती गुलाबी थंडीची चाहूल असते तर कुणासाठी ती वेदनांचा काळ असते, आठवांची काळी रात्र असते, कर्तव्याची धग असते, दुःखावर हळुवार फुंकर असते.
दरवर्षी न चुकता वर्षातून एकदा दिवाळी येते अन् वर्षभर पुरतील इतक्या गोड आठवणी देऊन जाते.
दिवाळी आली की…, नजरेसमोर येतात ती लहान लहान मुले. दिवाळी यायच्याआधीच त्यांना सुट्टीचे वेध लागलेले असतात. दिवाळीचा सण, दहा – पंधरा दिवस सुट्टी, मामाचं घर आणि मजामस्ती हे समीकरण जणू वर्षानुवर्ष ठरलेलंच…! दिवाळी आली रे आली की, लहान मुले आईबाबांकडे फटाक्यांसाठी हट्ट धरतात, हातात फटाके घेऊन अंगणभर फुलपाखरासारखी बागडत असतात, घरातल्या मोठ्यांच्या मदतीने रंगीत आकाशकंदील तयार करतात, मित्रमैत्रिणींना गोळा करत मातीचा किल्ला बनवतात त्यावर चित्र / मातीच्या रंगीत मुर्त्या मांडतात, तुझा चांगला की माझा ? याची स्पर्धाही लावतात आणि मग घरी बनवलेला चविष्ट, चटकदार फराळ फस्त करण्यासाठी दिवाळीचा शाळेत भेटलेला अभ्यास अन् दिवाळी अंक वाचण्यासाठी सज्ज होतात. खरचं, किती किती तो निरागसपणा.
दिवाळीत घरातल्या महिलांची तर चांगलीच दमछाक होते. दिवाळीच्याआधीच गोधड्या, पांघरूण धुणे, सगळी भांडी लख्ख घासणे, जळमटे काढणे , सजावट करणे… इ. कामांपासून ते फराळाचे नानाविध प्रकार बनविण्यापर्यंत सगळंकाही अगदी हौसेने करतात. मदत केली नाही तर वर्षभर टोमणे ऐकावे लागतील म्हणून पुरुष मंडळीही फराळ बनवण्याच्या कार्यात सहभागी होतात. नको नको म्हणत का होईना पैश्यांची चिंता न करता हव्या त्या गोष्टी घेऊन देतात. घरातली वयस्कर मंडळी ह्या दिवाळीला त्या पूर्वीच्या दिवाळीशी जोडू पाहतात. मातीने लिंपलेलं घर, दारातली तुळस, शेणाने सारवलेलं अंगण, सडारांगोळी शेजार – पाजाऱ्यांना आवडीने ताट ताटभर वाटलेला फराळ… इ. गोष्टी आठवतातच. जग झपाट्याने बदलत चाललयं आधुनिक दिवाळीतल्या आधुनिक गोष्टी पाहिल्या की…, आमच्यावेळी नव्हतं बाई असलं ऐकावं ते नवलचं ! हे शब्द आपसूकच त्यांच्या तोंडातून निघतात.
दिवाळीला प्रत्येकाचं दार सजलेलं असतं. जिवाभावाच्या माणसांनी घर भरलेलं असतं. रंगीत आकाशकंदील दारावर झोके घेत असतो नभातल्या चांदण्या उतरून आल्यासारखा सर्वत्र लाइटींचा झगमगाट असतो. चैतन्याचे, मांगल्याचे दीप घरोघरी तेजाळत असतात. “दीन दीन दिवाळी गाईम्हशी ओवाळी” म्हणत हसत – खेळत, आनंदाचे क्षण वाटत दिवाळी घरी येते. “आली माझ्या घरी ही दिवाळी” म्हणत प्रत्येक स्त्री हर्षभराने तिचे स्वागत करते. वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी,लक्ष्मीपूजन,
बालप्रतिपदा, दीपावली पाडवा अगदी आनंदाने साजरं करते. माझ्या घरी सुखसमृद्धी नांदो, उत्तम आरोग्य लाभो, ऐश्वर्याची धनधान्यांची बरकत होवो, अष्टलक्ष्मींची घरावर कृपादृष्टी राहो अशी प्रार्थना करते. भाऊबीजीला आलेल्या भावास पाहून लग्नाआधीच्या गोड आठवणी, केलेल्या खोड्या, केलेली भांडणे, लावलेला जीव सारंकाही क्षणार्धात तिच्या डोळ्यांसमोर तरळून येतं अन् माहेराच्या भेटीसाठी आतुरलेल्या सासरवाशनीच्या डोळ्यात ही दिवाळी नकळत अश्रू भरते.
रस्त्यावर मातीचे दिवे, पणत्या, मुर्त्या, लक्ष्मी विकणांऱ्याना दिवाळीमुळे रोजगार मिळतो. ज्यांच्यासमोर रोजचाच पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न उभा ठाकलेला आहे… त्यांच्याही घरात थोडासा का होईना, फराळ बनतो.
सर्वत्र लक्ष लक्ष दीप उजळत असताना काही व्यक्ती मात्र आपले कर्तव्य पार पाडत असतात सीमेवर देश रक्षणासाठी तैनात असतात तर काही काम केले नाही तर, पैसा मिळणार नाही म्हणून अहोरात्र राबत असतात, परदेशात राहून मायभुमीच्या आठवात दिवस काढत असतात काही ठिकाणी जवळची व्यक्ती गमावल्यामुळे दिवाळीतल्या त्या आठवणी आठवून डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात.
आईबाबांसोबत खरेदी करणाऱ्या मुलांना पाहून अनाथ मुलाला नकळत वाटून जाते मलाही जर आईबाबा असते तर…? त्यांनीही माझे असे लाड केले असते तर…? नजर कमी झालेले पण तरीही असंख्य आठवणी उरात ठेऊन वृद्धाश्रमात आपल्या मुलांची आठवण काढत या दिवाळीला येतील का आपली मुलं आपल्याला यायला…? असे कितीतरी प्रश्न निर्माण करते, वेडी आशा लावते ही दिवाळी.
सर्वत्र मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी होत असली, प्रेम अन् वात्सल्याची उधळण होत असली तरीही प्रत्येकाची दिवाळी वेगळी असते… त्या दिवाळीप्रती मनातली भावना वेगळी असते.
– कु. ऋतुजा गायकवाड, धायरी (पुणे)
9067628450