मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी गंभीर आरोप केले आहेत. “मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते,” असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर माध्यमांसमोर केला. या दाव्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.
कोर्टातील सुनावणी आणि पोटगीचा वाद
हा वाद मूळात धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील कथित वैवाहिक संबंध आणि पोटगीच्या मुद्द्यावरून सुरू झाला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने यापूर्वी धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. आज, ५ एप्रिल २०२५ रोजी माझगाव कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. करुणा मुंडे यांनी कोर्टात स्वतःला मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा केला आणि याला पुष्टी देण्यासाठी काही कागदपत्रे सादर केली, ज्यात मुंडे यांचे स्वीकृतीपत्र आणि अंतिम इच्छापत्र यांचा समावेश आहे. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)
कोर्टाने करुणा मुंडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करत धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आणि पोटगीचा निर्णय कायम ठेवला. या निकालामुळे करुणा मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला असून, धनंजय मुंडे यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. (हेही वाचा – नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिला मजुरांचा मृत्यू)
करुणा मुंडे यांचे गंभीर आरोप | Karuna Munde
सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, “मला हिरोईन बनण्याची ऑफर होती, पण मी ती नाकारून पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मला प्रेमात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते.” या दाव्यासोबतच त्यांनी मुंडे यांच्यावर धमकी आणि दबावाचेही आरोप केले. “मला रस्त्यावर आणि मीडियासमोर आणणारा धनंजय मुंडेच आहे. माझ्या मुलीला उचलून नेण्याची धमकीही मला दिली जाते,” असे त्या म्हणाल्या. (हेही वाचा –माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची भर सभेत थोबाडीत, वाचा सभेत काय घडले)
करुणा मुंडे यांनी पुढे असा दावा केला की, “धनंजय मुंडे यांचे काही दलाल, जसे की राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर, हे सर्व षडयंत्र रचत आहेत. हे लोक मुंडे यांना दारू आणि मुली पुरवतात.” या आरोपांनी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)
पुरावे आणि कोर्टाचा निर्णय
करुणा शर्मा यांनी कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्या सही आणि अंगठ्याचा ठसा असलेले मृत्युपत्र, स्वीकृतीपत्र, पासपोर्ट आणि रेशनकार्ड यांचा समावेश होता. या कागदपत्रांमध्ये करुणा यांचा मुंडे यांच्या पहिल्या पत्नी म्हणून उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, त्यांनी एक रेकॉर्डिंग लवकरच सादर करण्याचेही संकेत दिले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान)