जकार्ता : डेंग्यूचा फैलाव करणार्या डासांना रोखण्यासाठी अन्य एका प्रजातीच्या डासांचाच वापर करण्याची पद्धत इंडोनेशिया मधील संशोधकांनी विकसित केली आहे. या डासांमध्ये एका विशिष्ट प्रकारचा जीवाणू असतो जो डेंग्यूच्या विषाणूशी लढू शकतो.
या संशोधनाची सुरुवात विश्व मच्छर कार्यक्रम (डब्ल्यूएमपी)ने केली होती. त्यानुसार ‘वोल्बाचिया’ हा एक सामान्य बॅक्टेरिया असून तो कीटकांच्या 60 प्रजातींमध्ये आढळतो. मात्र, तो डेंग्यूचा फैलाव करणार्या एडिज एजिप्टी या डासांमध्ये आढळत नाही. त्यामुळे संशोधकांनी हा जीवाणू असलेल्या ‘चांगल्या’ डासांना पाळून त्यांचा वापर डेंग्यूच्या डासांविरुद्ध करण्याची ही पद्धत विकसित केली आहे.
डेंग्यूचे डास वोल्बाचिया जीवाणू असलेल्या डासांबरोबर प्रजनन केल्यास त्यापासून वोल्बाचिया डास म्हणजे ‘चांगले’ डासच निर्माण होतील. ते जरी माणसांना चावले तरी डेंग्यूचा फैलाव होणार नाही. ऑस्ट्रेलियाचे मोनाश विद्यापीठ तसेच इंडोनेशिया चे गदजा मादा विद्यापीठाने संयुक्तरीत्या याबाबतचे संशोधन केले आहे. त्यासाठी इंडोनेशियाच्या योग्यकर्ता शहरातील डेंग्यू प्रभावित परिसरांमध्ये प्रयोगशाळेत पाळलेले वोल्बाचिया डास सोडण्यात आले.