मुंबई : महाराष्ट्राला पोटधरून हसायला लावणा-या सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रे”तील विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहत या संदर्भातील माहिती दिली आहे.
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची संपुर्ण पोस्ट
एक निर्णय –
नमस्कार मंडळी..
अनेक वर्ष.. स्किट फॉरमॅट मध्ये काम करतेय.. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा..! 2011 पाहिलं पर्व विजेता जोडी, मांगले मी..आणि आज 2022 समीर विशाखा.. मंडळी हा प्रवास खरंच सोपा नाहीय…! मी काही फार great विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल ह्याचा शोध घेणे किंवा जे लेखकाने लिहिले आहे ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिक पणे केल.. माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही काम कशी फुलतील ह्याचा विचार करीत, त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे tunning, बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केल. दर आठवड्याला मिळणाऱ्या स्किट मधील हर भुमिकेची 15 मिनिट गेलीं 10 वर्ष मी जगले..!
माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात सचिन मोटे, सचिन गोस्वामींचा प्रचंड मोठा वाटा आहे…! त्यांच्यामुळेच मी विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली गेले. Wet-cloud productions च्या पहिल्या पहिल्या थेंबापासून ते आत्ता ह्याक्षणी डोळ्यात साठणाऱ्या थेंबपर्यंत मी जोडले गेले.. सातत्याने त्यांच्या सोबत काम करतेय..! आणि ह्या फॉरमॅट मधेही एक फेरी हिंदी कॉमेडी मध्ये ही मारून आले..!. दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधी च टेंशन भयानक असत. कालच्यापेक्षा चांगल करायचं, त्या टेन्शन मधून काहीकाळ बाहेर पडतेय..! (अजून दोन तीन एपिसोड दिसेन shoot झाले आहेत ते.)
एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली 20/25 दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक 500 ते 1000 प्रयोगाची, किंवा मग सिरीयल मधली असो, मला ह्या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे..!
इथलाही प्रवास खडतरच असतो, सोपा नाहीच तो. पण ना, इथे एकाच भूमिकेत राहून काही काळ प्रवास करता येतो, त्या भूमिकेबरोबर तिला न्याहाळात, तिला जपत, तिला अंजारातगोंजारात, तिला वेळ देऊन, तिच्यासोबत खेळता येत, शांत चित्ताने दिग्दर्शकाचा “ओके” हा शब्द कानाशी साठवून सुखाने घास घेऊन निजता येत. आत्ता हे “असं” काम शांत चित्ताने करण्याची इच्छा झाली आहे..!
रसिकहो आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत. त्याबद्दल खरच मनापासून आभार.
हास्य जत्रेने मला खुप काही दिलंय आणि तुम्ही जत्रेवर नितांत प्रेम केलेत.. जत्रेतल्या माझ्यावर भरभरून पत्र/ लेख लिहिलीत, कविता केल्यात.. माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केलात, त्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवंत समजते. तुम्ही जसं हास्यजत्रे वर प्रेम केलंत तसच मी ही खुप प्रेम केल, करतेय आणि करेन. जीव ओतून काम केल..! प्रत्येक स्किट नंतर गोस्वामी काय म्हणतील ह्यासाठी कानाचे द्रोण ही केले..! त्यात कधी यश आल आणि कधी नाही..! प्रयत्न करत राहिले पण आत्ता थोडी धावपळ होतेय.
मला खरंच अभिमान आहे कीं मी ह्या जत्रेचा भाग झाले.. आणि हा भाव मनात आयुष्यभर राहील. जत्रेतील माझा सोबती सम्या.. ह्याचे मनापासून आभार आणि त्याला खुप प्रेम. त्याने माझी अनेक रूप लिहिली.. आम्ही एकमेकांना पूरक साथ देत गेलो. रुसवे फुगवे नसतील तर काय गंमत येणार? नाही कां..? तर ते ही झालेच.. पण जेव्हा मंचावर असायचो तेव्हा “दोन शरीर एक मन “झालेलो असायचो. त्याच्या बरोबरचा हा प्रवास कायम स्मरणात राहील असाच आहे.. खूपदा त्या वेड्या कडे पाहुन फुटले आहे मी.. ठार वेड्या बरोबर परफॉर्म करण अवघड असत… पण धमाल आली.. सम्या always love u for your madness.
अनेक सवंगडी दिले, लहान भावंड दिली.. जिवाभावाची माणसं दिली, हा प्रवास केवळ सुखाचा झाला.. आणि तो असच लक्षात राहावा म्हणून देखील थांबतेय.. भाकरी सतत पालटत राहावी नाहीतर ती करपते आणि नीट तयार झाली कीं टोपलीत टाकावी. (इति गुरुजी)
आंबे तयार कीं उतरवावे.. नाहीतर ते डागळतात. थोडी चव कमीजास्त होते. म्हणून थांबतेय काही काळ. थोडं कंटाळा पण आलाय त्याच त्याच कामाचा. खुप वर्ष एकच पीक शेतकरी देखील काढत नाही मधेच काहीतरी वेगळं बी रोवतोच कीं.. तस काहीस वाटतय. आणि एक, मला दुसरं मोठ्ठ काम आलंय, मला सिरीयल फिल्म मिळालीय.. हे अजून तरी काही घडलं नाहीय.. (पण पुढे नक्कीच घडेल) म्हणून मी जत्रा सोडतेय तर असं काहीही नाही. किंवा नवीन पिढी तयार होतेय हे सहन होत नाहीय असले घाण आरोपही कोणी लावू नका. कारण पिढ्या घडायलाच हव्या…! आणि आपली एक्सिट पण ध्यानात असायलाच हवी. “जा आत्ता” असं म्हणण्यापेक्षा. “अर्रर्रर्रर्र” हे ऐकायला जास्त छान वाटतं नाही कां..! तर.. मंडळी थोडं स्किट व्यतिरिक्त काम करायचा विचार आहे. वेगळ्या धाटणीच काम करायचं आहे. मंडळी कायम लोभ असावा..!
आत्त तूर्तास जत्रेतून राम राम पण नक्कीच दुसऱ्या भूमिकेतुन दिसेनच.
तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद असू द्यावे. माझ्यातल्या अभिनेत्रीच्या आणि नाटक निर्मातीच्या असंच पाठीशी रहा.
संपूर्ण जत्रा team, wetcloud productions सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद ओक, सई, प्राजक्ता आणि अर्थात सोनी मराठी. अमित फाळके, गणेश सागडे, अमित दीक्षित, सिद्धगुरु आणि भालवणकरसर धन्यवाद आणि मनापासून खुप खुप प्रेम #महाराष्ट्राचीहास्यजत्रा
भेटूया लवकरच… तोवर नाटकाला यां.. “कुर्रर्रर्रर्र” करायला.
– विशाखा सुभेदार