Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडछत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस ३६६ पुस्तके व ३६६ वृक्ष रोपांचा अभिषेक जयंती...

छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस ३६६ पुस्तके व ३६६ वृक्ष रोपांचा अभिषेक जयंती साजरी

मराठवाडा जनविकास संघातर्फे ‘पुस्तक घ्या, पुस्तक द्या’ उपक्रमाचे आयोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर :
छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जंयती व मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या मुर्तीस ३६६ पुस्तके व ३६६ वृक्ष रोपांचा अभिषेक करून ‘पुस्तक घ्या, पुस्तक द्या’ उपक्रमातून राजे शिवाजीनगरमध्ये जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, मराठवाडा जनविकास संघातर्फे ‘पुस्तक घ्या, पुस्तक द्या’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अभियंते नितीन चिलवंत यांनी ‘पुस्तक घ्या, पुस्तक द्या’ या स्वामी रामानंद तीर्थ पुस्तक दान अभियानाची संकल्पना मांडली होती. याच धर्तीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, अभियंते नितीन चिलवंत, उद्योजक शंकर तांबे, बळीराम माळी, अमोल लोंढे, गोपाळ पाटील, प्रा. डॉ. प्रविण घटे, चंद्रकांत भोजने, अनिल मुंडे आदी उपस्थित होते.



दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी मराठवाडयातील आठही जिल्ह्यात पुस्तक दान अभियान राबविण्यात आले. चंद्रकांत भोजने यांनी ३६६ पुस्तक मराठवाडा जनविकास संघास छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभ मुहुर्तावर भेट दिली.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी महाराष्ट्र बोर्ड व केंद्रीय बोर्ड असे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे ‘पुस्तक घ्या, पुस्तक द्या’ हे स्वामी रामानंद तीर्थ पुस्तक दान अभियान येत्या १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. ही पुस्तके मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत.

शंकर तांबे यांनी मराठवाड्यातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे सांगितले. बळीराम माळी यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहयोगातून पिंपरी चिंचवड शहरात हा उपक्रम पार राबवू, असे सांगितले. अमोल लोंढे यांनी सोशल मिडीयातून आपली संकल्पना सर्वदूर पोहचवू असे सांगितले. गोपाळ पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. चंद्रकांत भोजने यांनी आपल्याकडील पुस्तके चांगल्या संस्थेकडे दिली असल्याचे समाधान असून ती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतील, असे सांगितले. अनिल मुंडे यांच्या प्रयत्नातून या अभियानास मोठा दाता मिळाला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन चिलवंत यांनी, आभार बळीराम माळी यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय