पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शहीद महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २० पेक्षा अधिक गावात जनतेने सत्याग्रह करत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अमंलबजावणी करण्याची मागणी केली. तालुक्यात स्थरावर मनरेगाच्या अमंलबजावणी करण्याबाबत प्रशासन कोणतीही सकारात्मक निर्णय घेत नसल्या कारणाने अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे.
लोकांच्या हाताला गावातच कसे काम मिळेल, यासाठी ७ आक्टोबर पासून भिमाशंकर ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असे १६० किलोमीटर किसान सभेचे शिष्टमंडळ पायी चालत जाऊन कोरोनाच्या काळात योग्य ती काळजी घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शिष्टमंडळात २० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
अनेक वेळा आंबेगाव तालुका तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे मागण्या मांडल्या नंतरही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेकडे ऐन लॉकडॉऊन काळात कामाची मागणी करूनही काम उपलब्ध झालेले नाही, अशा सर्व मजूरांना बेरोजगार भत्ता देण्यात यावे, किमान पाच मजूरप्रधान कामे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील प्रत्येक ग्रामपंचायतच्या शेल्फवर ठेवावीत, प्रत्येक कुटुंबाला कोणतेही शुल्क न घेता जॉबकार्ड त्वरित मिळावे, जॉबकार्डचे नूतनीकरण त्वरित करून द्यावे, आंबेगाव तालुक्यातील रोजगार हमीच्या कामांचे सोशल ऑडिट करण्यात यावे, आंबेगाव तालुक्यातील ज्या गावात काम रोजगार हमीवर काम करून दोन – दोन महिने अजून पगार मिळाला नाही त्यांना त्यांच्या कामांची मजुरी तात्काळ अदा करण्यात यावी, सुमारे १६ गावात रोजगार हमीच्या कामाची मागणी मजुरांनी करूनही काम दिले गेले नाही, मजुरांची फसवणूक केली गेली, याला दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पदयात्रेत तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी यांच्यासह २० जणांचे शिष्टमंडळ असणार आहे.