विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचा 15 जून पासून बेमुदत संप
अकोले (अहमदनगर) : आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 15 जून 2021 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सिटूसह इतर विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या फेडरेशनच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वे चे कामही अतिरिक्त मोबदला न देता करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटीजेन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप होत आहे.
अकोले तालुक्यातील आशांनी एकत्र येत या संपात सहभागी होत असल्याचे निवेदन आज प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेटे यांना दिले. यावेळी आशा कर्मचारी संघटनेच्या नेत्या संगीता साळवे, भारती गायकवाड, छाया कुलधरण, चित्रा हासे, अस्मिता कोते, सुनीता गजे, रुपाली पवार, अरुणा चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने आशा उपस्थित होत्या.
किसान सभेचे डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, ज्ञानेश्वर काकड ह्यांनी यावेळी आशा कर्मचाऱ्यांच्या संपाला किसान सभेच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.