पुणे, दि. १५ : आशा व गटप्रवर्तकांनी हौसेने संप केलेला नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या शुभा शमीम यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सुनावले आहे.
राज्यातील ६८ हजार पेक्षा जास्त आशा व गटप्रवर्तकांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. यावर राजेश टोपे हे पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते की, “आशा व गटप्रवर्तकांंच्या मागण्यांवर वाटाघाटी सुरु असताना संप करणे योग्य नाही” यानंतर शुभा शमीम यांंनी टोपे यांना खडे बोल सुनावले आहेत.
शुभा शमीम यांनी म्हटले आहे की, आशा व गटप्रवर्तक गेली दीड वर्षे कोरोनाच्या महामारींंशी लढा देत काम करत आहेत, या कामाला कुठेतरी न्याय मिळत नसल्याची भावना आहे. एवढे काम करुनही योग्य मोबदला दिला जात नाही. कायमस्वरूपी काम करुनही योग्य मोबदला दिला जात नाही. ७२ प्रकारची कामे आशांना करावी लागतात. मासिक उत्पन्न हे ५ – ६ हजारच मिळते, त्यामध्येही कपात केली जात असल्याचे शुभा शमीम म्हणाले.
पुढे बोलताना शुभा शमीम म्हणाल्या की, आशा व.गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांंचा दर्जा द्यावे, किमान १८,००० रुपये आशांना व २१,००० रुपये गटप्रवर्तकांना वेतन द्यावे, कोव्हीड काळातील कामासाठी भत्ता देण्यात यावेत या रास्त मागण्या आहेत. सरकारशी झालेल्या चर्चेत कुठल्याही मागणीवर ठोस निर्णय न झाल्याने संपावर जाणे भाग पडले असल्याचेही त्या म्हणाले. तसेच सरकारशी आम्ही चर्चेला तयार आहोत. सरकारने आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन लेखी आश्वासनानंतर आम्ही विचार करु. तोपर्यंत संप चालूच राहणार आहे.