Monday, December 23, 2024
Homeकृषीशेती विकास केंद्रीत अर्थसंकल्प - मानव कांबळे

शेती विकास केंद्रीत अर्थसंकल्प – मानव कांबळे

मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सन 2022-23 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेती विकास केंद्रित असल्याचे दिसून येते. दोन वर्षांपासून प्रलंबित असणारे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांच्या अर्थ सहाय्याची अंमलबजावणी यावर्षी करण्याचे अर्थमंत्र्यांनी घोषित केले आहे, हे स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर फळबागा विस्तारीकरणासाठी व शेती संशोधनासाठी तसेच शेततळ्यांसाठी वाढविण्यात आलेले अनुदान हेही स्वागतार्ह आहे. 

शिक्षण, आरोग्य आणि दळणवळण क्षेत्रात केलेली आर्थिक तरतूद आणि जाहीर केलेल्या योजना यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर नागरिकांसाठी ते हिताचे ठरेल. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महागाईमध्ये वाढ होण्याचे संकेत, अगोदरच देशाच्या प्रधानमंत्री यांनी दिलेले आहेत, त्याचाच पुनरुच्चार अजित पवार यांनी केलेला आहे, परंतु या महागाईतून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी म्हणून पेट्रोल डिझेल या इंधनांवरील राज्या कडून वसूल करण्यात येणाऱ्या करांमध्ये काही सूट मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याबाबतीत अर्थमंत्र्यांनी पूर्णपणे निराशा केली आहे. 

राज्यातील शेतमजूर व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यात हा अर्थसंकल्प निराशा करणारा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करून, राज्य सरकारने स्वागतार्ह  पाऊल उचलले आहे. 

अर्थसंकल्प : शेतकऱ्यांची घोर निराशाच… अधिक तरतुदींची अपेक्षा होती – शेतकरी नेते डॉ. अजित नवले

पिंपरी चिंचवड : जागतिक महिला दिनानिमित्त ‘आरोग्य व रक्तदान शिबिर’

एसटी कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून संपावर आहेत, त्यांना वेतन वाढ दिली असली तरी, त्यामध्ये वाढ करणे, आणि या कामगारांना इतर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक तरतूद होणे अपेक्षित होते, परंतु त्याबाबतीत काही तरतूद न केल्यामुळे एसटी पुन्हा सुरू व्हावी, या बाबतीमध्ये सरकार उदासीन असल्याचे दिसून येते. राज्यातील नाले सफाई करण्याच्या कामाचे पूर्ण यांत्रिकीकरण करण्याची घोषणा मात्र अतिशय उत्तम असून, त्याची अंमलबजावणी तातडीने करणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.

थोडक्यात महाविकास आघाडीचा हा अर्थसंकल्प हा आर्थिक अडचणीच्या काळात थोडाफार दिलासा देणारा, परंतु अंमलबजावणीबाबत स्पष्टता नसणारा आहे असे म्हणावे लागेल.

– मानव कांबळे

 अध्यक्ष – नागरी हक्क सुरक्षा समिती

पिंपरी चिंचवड : कृष्णा नगर येथे आरोग्य शिबीर संपन्न !


संबंधित लेख

लोकप्रिय