उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील हाथरस या गावी दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आली. १४ सप्टेंबर २०२० रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका १९ वर्षाच्या दलित शेतमजूर तरुणीवर वरिष्ठ जातीच्या चार नराधमांनी निर्दयपणे सामुदायिक बलात्कार केला.
नंतर त्याही पुढे जाऊन अतिशय विकृतपणे तिचे हाल हाल केले. तिची जीभ तोडली. तिचे कंबरडे मोडले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तरीही पोलिसांनी तब्बल पाच दिवस एफआयआर नोंदवला नाही. तिला तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असूनही ती देण्यात आली नाही. शक्य असूनही आदित्यनाथ सरकारने तिचे प्राण वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. इतकेच नव्हे, तर पोलिसांनी तिचे कलेवर तिच्या कुटुंबियांना न देता त्याची परस्पर विल्हेवाट लावली. योगी सरकारच्या कारकिर्दीत उच्च जातीय अहंकार आणि मुजोरी कोणत्या थराला जाऊन पोहोचली आहे, याचेच ते निदर्शक आहे. दलितांना मृत्यूनंतरही मानवी प्रतिष्ठा नाकारण्याचे अत्यंत गर्हणीय कृत्य उत्तर प्रदेशच्या प्रशासनाने केले आहे.
हाथरसमधील दलित शेतमजूर मुलीवरील सामुदायिक बलात्कार आणि तिची हत्त्या हे भाजपच्या कारकिर्दीत उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळलेली आहे, याचेच निदर्शक आहे. बलात्कार आणि खून करणाऱ्या नराधम गुन्हेगारांसोबतच एफआयआर नोंदवण्यास नकार देणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.