पुणे, दि.13: शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित शिवभोजन केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे छगन भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षणबाबत पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
शिवभोजन केंद्राला जागा बदल करण्याबाबतच्या नियमात शिथिलता देण्याबाबत लवकरण शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे. शिवभोजन केंद्र देताना दिव्यांग तसेच महिला यांना प्राधान्य द्यावे, या माध्यमातून अधिकाधिक गरजू महिलांना रोजगार मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे शहर तसेच जिल्ह्यात दक्षता समित्यांची गतीने स्थापना करावी, असे सांगून भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात धान्याचा उपयोग संपुर्ण क्षमतेने करा. शिल्लक धान्यापैकी ५ टक्के धान्य गरजु पात्र लाभार्थ्यांना वितरण करा. गरजु तसेच नियमात बसत असेल त्याला शिधापत्रिकेचे वितरण करा.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, परिमंडल अधिकारी गिरीष तावले, प्रशांत खताळ, चांगदेव नागरगोजे आदी उपस्थित होते.