सोलापूर : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ.नरसय्या नारायणराव आडम यांच्या 79 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून 2023 रोजी सांयकाळी 5 वाजता सोलापूर महानगरपालिका समोरील नॉर्थकोट हायस्कूल मैदान येथे आत्मचरित्र प्रकाशन सोहळा माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. या सोहळ्यास माकपचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार कॉ.सीताराम येचुरी, माकपचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे, माकपचे राज्य सचिव डॉ.उदय नारकर आदींसह उपस्थितीत राहणार आहेत.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे केंद्रीय समिती सदस्य तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव राहिलेले कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर जिल्ह्यात माकपच्या उभारणीसाठी दिलेले योगदान बहुमोल आहे. जनवादी आणि वर्गीय लढ्याची धार वाढवण्यासाठी अविरतपणे संघर्षाच्या मैदानात उतरून जनतेला न्याय मिळवून देताना त्याग आणि निस्पृह वृत्तीतून माकपचा जनाधार वाढवण्यात यशस्वी झाले.
1962 पासून कामगार चळवळ आणि मार्क्सवाद, लेनिनवादाकडे आकर्षित होऊन अनेक मार्क्सवादी विचारवंत, प्रभावी वक्ते, चळवळीतील अग्रणी या सर्वांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत राहिला. मुळातच त्यांच्या घरी त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक आणि सोलापूरमधील माकपचे संस्थापकीय सदस्य असल्यामुळे स्वाभिमान आणि स्वावलंबन, अन्यायाविरुद्ध चीड, सत्याची चाड, बाळकडू मिळाले.
कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या आयुष्याचा आजवरचा प्रवास हा अनेक स्थित्यंतरातून घडलेला आहे. ते ज्या विचारांना प्रभावित होऊन प्रवासाची सुरुवात केली, त्या विचारानं त्यांना माणूसपण आणि माणूसभान दिला. तो विचार म्हणण्यापेक्षा जगातील समूळ दारिद्रयनिर्मूलनाचा कानमंत्र होता. असा तो आमूलाग्र बदलाचा विचार अर्थातच मार्क्सवादी विचार जे आयुष्याचे अंतिम ध्येय आहे. म्हणूनच त्यांची जडणघडण ही मार्क्सवादी सिध्दांतनुसार होऊ शकली.
त्यांचा जन्म 1 जून 1945 साली सोलापूर च्या पूर्वभागातील एका कामगार कुटुंबात झाला. त्यांची जन्मदात्री आई लक्ष्मीबाई विडी कामगार तर वडील भारतीय आणि गोवामुक्ती स्वातंत्र्य संग्रामातले सैनिक नारायणराव गिरणी कामगार होते. अठराविश्वा दारिद्रय त्यांच्या घरी वास करत होते. घरात थोरले बंधू राजाराम, थोरली बहीण भारती, सरस्वती, लहान भाऊ दत्तात्रय आणि लहान बहीण राधाबाई असा परिवार होता. या सर्वांचे पालन पोषण आणि त्यांची जडणघडण याची मुख्य जबाबदारी त्यांच्या वडिलांवर असणे स्वाभाविकच होते. मात्र वडिलांना मुळात देशप्रेम आणि स्वातंत्र्य चळवळीकडे ओढा असल्याने ते सातत्याने त्यात सहभागी होत असत. कित्येक वेळा त्यांना भूमिगत ही व्हावे लागले. वडिलांची ही देशसेवा आणि धाडसाचे कार्य त्यांना प्रेरणा देत गेली.
मास्तरांना ही देशाच्या सेवेकरिता लष्करात भरती होण्याची ओढ लागली. ते इयत्ता चौथीत असताना त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्या वडिलांनी स्काऊट बी चे कपडे मास्तरांसाठी शिववून घेतले. ती आठवण आजही त्यांना ताजी वाटते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लष्कर भरती ची जाहिरात आली आणि ते त्या भरती साठी तयारीने गेले. लष्कराच्या सर्व कसोट्या व निकष पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय अहवालात माझ्या छातीवर पांढऱ्या रंगाचा डाग आढळून आल्याने त्यांना लष्कर भरती साठी अपात्र ठरवण्यात आले. त्या दिवशी रात्रभर ते धायमोकलून रडले, विव्हळले स्वतःबदलचा तिटकारा वाटला, ती सल त्यांना झोपु देत नव्हती. ते खूपच अस्वस्थ झाले. वैफल्यग्रस्त झाले होते, दुसऱ्या दिवशी त्यांचे वडील त्यांना जवळ घेऊन त्यांची समजूत काढले. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केले. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले की, “तू देशसेवेसाठी सैनिक नाही झाला तरी काही पर्वा नाही देशातील कामगार वर्गासाठी लढ, ही सुद्धा देशसेवाच आहे.”
त्या दिवशी त्यांनी हा विचार त्यांच्या डोक्यात पेरले आणि मास्तर सुसाट वेगाने सुटले ते आजमितीला त्यांना कोठे गतिरोधकच लागला नाही. त्याग, प्रामाणिकपणा, जिद्द, कठीण परिश्रम, धैर्य, अन्यायाविरुद्ध, चीड, समर्पित वृत्ती आणि अविश्रांत लढा ही चळवळीतीले मूल्ये अंगिकारून चळवळी स्वतःला झोकून दिले.
पहिल्यांदा आडम मास्तर हे 1968 साली महापालिकेच्या निवडणूकीत काँगेसचे तत्कालीन दिग्गज नेते माधवराव कोंतम यांच्या विरोधात म्हणजे प्रस्थापितांविरुद्ध कामगारांचा प्रतिनिधी अशी झुंज दिली. यात निसटता पराभव होता. मात्र, त्यामुळे त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. यानंतर येईल त्या परिस्थितीत, येईल त्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावरचा संघर्ष सुरू झाला. पोलिसांची दमनशाही, लाठ्या-काठ्या, तुरुंग, भूमिगत, प्राणघातक हल्ले, खोटे गुन्हे, यंत्रणेचा दबाव हा वाढतच राहिला पण कधीच माघार घेतली नाही. ही लालबावट्याची पोलादी शिस्त कधीच भंग होऊ दिली नाही. एकंदर सरासरी आयुष्यात 2 वर्षे तुरुंगवास, दोनशेहून अधिक खटले, तीन वेळा मिसा कायद्यान्वये अटक, महाराष्ट्रातील सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, येरवडा, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, मुबंई असे निम्याहून अधिक तुरुंग पाहिले. आजही गुन्हे, खोटी खटले चालूच आहेत. रस्त्यावरच्या लढाई सोबत न्यायालयीन लढाई सुद्धा अविरतपणे सुरू आहे.
कामगार चळवळ आणि न्याय हक्काच्या लढ्यावर विश्वास ठेवून आमजनता आणि कामगारांनी त्यांना तीन वेळा नगरसेवक व तीन वेळा आमदार म्हणून त्यांचे सभागृहात व विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या प्रत्येक संधीला परिपूर्ण न्याय देण्याचे कर्तव्य बजावले. कष्टकरी-कामगार, भटके विमुक्त, संघटीत असंघटीत कामगार, मध्यमवर्गीय, बहुजन वर्ग, महिला, विद्यार्थी, युवक, व्यापारी, उद्योजक आदींच्या प्रश्नांवर विधिमंडळात तासनतास भूमिका मांडली. वेळ प्रसंगी सभागृह बंद पाडले पण पोटतिडकीने प्रश्न मांडून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले.
तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभा पाटील यांच्या हस्ते 2008 साली उत्कृष्ट विधानसभापटू (उत्कृष्ट वक्ता) हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा गौरव तमाम श्रमिकांचा होता, असेही आडम मास्तर म्हणतात.
याच अनुषंगाने मास्तरांना भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्ही.पी.सिंग, देवेगौडा,अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींना समक्ष भेटून कामगारांचे व वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन शिष्टमंडळासोबत सल्ला मसलत केली.
मास्तरांचे आई, वडील, पत्नी, बहीण-भावंडे आणि मुलांसोबत तब्बल 25 वर्षे भाड्याच्या अत्यंत दाटीवाटीच्या घरात गुजराण केल्यामुळे ती गैरसोय आणि वास्तव काय असते ते भोगले आणि जगले सुद्धा. वेळप्रसंगी कित्येक वर्षे, कित्येक रात्री मारुती मंदिरात काढावे लागले. हा त्यांचा अविस्मरणीय अनुभव आहे. ही वेळ कोणावरही येऊ नये, ही त्यांच्या अंर्तमानातील हाक सतत काही तरी अभिनव कार्य करण्याची चेतावणी देत होती. म्हणून ते पहिल्यांदा 1978 ला आमदार झाल्यावर त्यांच्या आईला दिलेल्या वचनानुसार विडी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी कॉ.गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून कुंभारीच्या माळरानावर श्रमिकांचा ताजमहाल म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या व गणलेल्या 10 हजार विडी कामगारांना अत्यल्प दरात घर मिळवून दिले. तसेच कॉ.मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून 5500 घरे त्यानंतर असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या 30 हजार कामगारांसाठी रे नगर ची योजना अस्तित्वात आणली. रे नगर म्हणजे जागतिक कीर्तीचे महत्वाकांक्षी अभूतपूर्व एकमेव महागृहनिर्माण प्रकल्प होय.
मागील सहा एक दशकात अनेक चळवळीतले साथीदार ज्यांच्यामुळे ते घडले त्यांच्या प्रति असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा इवलासा प्रयत्न या त्यांच्या आत्मचरित्र पुस्तकाच्या रूपाने व्यक्त होत आहे.
या पुस्तक निर्मितीसाठी सोलापुरातील अनुभवी पत्रकार दत्ता थोरे, संतोष पवार यांनी आत्मचरित्र लेखनासाठी शब्दांकनाचे परिश्रम घेतले. बाळकृष्ण दोड्डी यांनी समन्वय साधले. सदर पुस्तक पुण्यातील युनिक फिचर्स च्या समकालीन प्रकाशनच्या वतीने करण्यात येणार असून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार व सिद्धहस्त लेखिका गौरी कानेटकर यांनी संहिता संपादन तर सुहास कुलकर्णी यांनी पुस्तकाचे संपादन केले तसेच आनंद आवधानी यांनी मुद्रण समन्वय साधले आहे.
माकपचे महासचिव कॉ. खासदार सीताराम येचुरी यांनी मनोगत व शुभेच्छा संदेश दिले असून माकपचे पॉलीट ब्युरो सदस्य कॉ.डॉ.अशोक ढवळे यांनी प्रस्तावना दिली आहे.
किमान 50 हजार जनसमुदायांच्या साक्षीने हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती अँड.एम.एच.शेख यांनी दिली. याची जय्यत तयारी ही सुरू आहे असे ही सांगण्यात येते.
हे ही वाचा :
Blood donation : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद
ओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पिंपरी चिंचवड शहरात दाखल
“शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान” राज्यव्यापी अभियानाचा कसा होणार फायदा पहा !
“पर्यावरण ऱ्हासासाठी श्रीमंत देश जबाबदार!” मधुश्री व्याख्यानमालेत डॉ.सुरेश बेरी यांचे प्रतिपादन
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती