Pune Swargate ST Depo Rape Case : पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या स्वारगेट एस.टी. डेपोत एका २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून डेपोतील सुरक्षेसाठी नेमलेल्या २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. (Swargate Rape Case)
पीडित महिला मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फलटण, सातारा येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. यावेळी आरोपीने तिला ताई कुठे जायचे आहे म्हणून विचारले अन् तिची दिशाभूल करून एका निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या एस.टी. बसमध्ये नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि पसार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथून काही मीटरच्या अंतरावरच पोलीस ठाणे आहे, तरीही हा अमानुष प्रकार घडू शकला. या घटनेनंतर स्वारगेट बस डेपोतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दत्तात्रेय गाडेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद (Swargate Rape Case)
या घटनेतील आरोपीची ओळख पटली असून दत्तात्रेय रामदास गाडे (वय 36 वर्षे) असे या आरोपीचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. आरोपी दत्तात्रेय गाडे त्याच्यावर याआधीच चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंगसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१९ साली तो एका दरोड्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला होता.
आरोपीला पकडण्यासाठी 1 लाखाचे बक्षिस
आश्चर्याची बाब म्हणजे हा आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याचा शोध सुरू आहे. तसेच आरोपीला पकडण्यासाठी 1 लाखाचे बक्षिस देखील ठेवण्यात आले आहे.
कबाड बसमध्ये महिलांचे कपडे, कंडोम आणि दारूच्या बाटल्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी MSRTCच्या डेपोमध्ये कबाड झालेल्या जुन्या बसेसमध्ये कंडोमचे पॅकेट आणि महिलांचे कपडे आणि दारूच्या बाटल्या आढळल्याचे म्हटले आहेत. त्यामुळे जुन्या बसांचा गैरवापर होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वारगेट एस.टी. डेपो हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सर्वात मोठा बस जंक्शन आहे. मात्र, येथे सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कुचराई केली जात असल्याचे उघड झाले आहे.

हे ही वाचा :
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!