जुन्नर : एसएफआय चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ हे समाजशास्र या विषयातून व पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे यांनी समाजकार्य या विषयातून राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या सहाय्यक पात्रता परीक्षा (युजीसी नेट ) परीक्षेत यश संपादन केले आहे. UGC NET Exam
जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील हातवीज येथील सोमनाथ निर्मळ हे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय) चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व केंद्रीय समिती सदस्य म्हणून विद्यार्थी चळवळीत भूमिका बजावत आहेत. एकीकडे विद्यापीठात पीएचडी संशोधन, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई असे दुहेरी काम ते करत आहते. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे ‘महाराष्ट्रातील आदिवासींचे उच्च शिक्षण: धोरणे व सहाय्यकारी व्यवस्था’ या विषयवार पीएचडी करत आहेत. यानिमित्ताने ते मागील सहा महिने नार्वे या देशात देखील शिक्षणासाठी जाऊन आले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील पंचाळे खुर्द येथील समीर गारे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय) चे पुणे जिल्हा सहसचिव व आंबेगाव तालुका समिती सचिव म्हणून विद्यार्थी चळवळीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढा देतात. यासोबतच ते गृप ग्रामपंचायत पंचाळे बुद्रुक चे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. त्यांनी कर्वे समाजसेवा संस्था, पुणे येथून समाजकार्य विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे . हे शिक्षण घेत असताना त्यांनी ‘आंबेगाव तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा सद्यस्थितीचा अभ्यास’ या विषयात संशोधन प्रकल्प पुर्ण केला आहे. सद्या ते आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र येथे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करतात.
अभ्यास आणि संघर्ष हे ब्रीद घेत या दोनही युवकांनी ग्रामीण भागातून येऊन एकीकडे शिक्षण व दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई अशा दुहेरी भूमिका हे युवक बजावत आहेत. परिवर्तनाच्या लढाईतील हे साथीदार एमएच सेट या राज्य पातळीवर घेतल्या जाणाऱ्या सहाय्यक पात्रता परीक्षा देखील हे दोन्ही युवक उत्तीर्ण आहेत आणि नुकतीच राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे, या यशाबद्दल युवक – विद्यार्थ्यांमधून त्यांचे कौतुक होत आहे.