Sunday, December 22, 2024
Homeग्रामीणमाथाडी चळवळीतील गुंडप्रवृत्तीच्या विरोधात कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माथाडी चळवळीतील गुंडप्रवृत्तीच्या विरोधात कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पोलिसांच्या दुर्लक्षामुळे माथाडी चळवळी गुंड टोळ्या तसेच समाजकंटकांनी शिरकाव केला असून कायद्यातील तरतुदींचा वापर करीत व्यापारी, इतर आस्थापना यांच्याकडून खंडण्या वसुलीचे सत्र चालविले आहे. दुसरीकडे काही कामगार नेत्यांनीच ठेकेदारी सुरू केली आहे. यामुळे व्यापारी आणि उद्योजकच नव्हे तर प्रस्थापित कामगार संघटनाही त्रस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून या अपप्रवृत्तीं विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

माथाडी कायदा, रोजगार हमी योजना, सुरक्षा रक्षक कायदा ही कष्टकऱ्यांच्या हिताची तत्कालीन राज्यकर्त्यांनी उचललेली पुरोगामी पावले होती. त्याचे  देशात कौतुक तर झालेत पण रोजगार हमी योजना साऱ्या देशात लागू झाली. माथाडी कायदाही देशभर लागू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र एका बाजूला ही स्थिती असताना या कायद्याचा गैरवापर करून व्यापारी उद्योजक, अन्य अास्थापना यांना वेठीस धरून खंडण्या उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.  

 सध्या कुणीही उठावे आणि स्वतःला माथाडी नेता म्हणून जाहीर करावे असा प्रकार सुरू आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी याचा फायदा घेऊन संघटना स्थापन केल्या आहेत. संघटनेच्या नावाने पावती पुस्तके छापून त्याआधारे कामगारांकडून वर्गणी वसूल करण्याचे प्रकार होत आहेत, तर दुसरीकडे मालकांना धाकदपटशा दाखवून त्यांच्याकडून खंडण्या उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. 

दुसरीकडे काही माथाडी नेतेच कामगार पुरविणारे ठेकेदार बनू लागले आहेत. मालकाशी सौदेबाजी करून माथाडींची कामे करून दिली जातात. यात मूळ नोंदीत कामगारांचे काम हिरावले जातेच, पण ज्यांच्या कडून हे काम करून घेतले जाते, त्यांनाही अल्प मजुरी देऊन त्यांचे शोषण केले जाते. तर जेथे कामगारांना मजुरीच्या स्वरूपात चांगला मोबदला मिळतो तेथे अशा नेत्यांनी स्वतःची नावे माथाडी टोळीत घालून घेतली आहेत. अशा ठिकाणी खरे कामगार महिनाभर राबून मजुरी मिळवतात, परंतु या नेत्यांनाही त्यांना समान वाटा द्यावा लागतो. यात खरा कामगारांचे शोषण होत आहे. 

वाराईच्या कामात गुंडांचा हैदोस

सर्वात गंभीर प्रकार सुरू आहे तो वाराईच्या कामात. मालट्रक आल्यानंतर त्यातील माल खाली उतरवून देण्याच्या कामाला ‘वाराई’ म्हटले जाते व हे काम करणाऱ्यांना ‘वारणार कामगार’ म्हणून संबोधले जाते. या कामात सध्या संघटित लूट सुरू असून, त्यामुळे व्यापारी तसेच अन्य आस्थापना हैरान झाल्या आहेत. मालाचा ट्रक आला की येथे हजर व्हायचे आणि हा आमचा ‘एरिया’ आहे. त्यामुळे मजुरीचे पैसे आम्हालाच मिळाले पाहिजेत, त्याशिवाय ट्रक खाली करू देणार नाही, म्हणून मालकांना धमकावले जाते. मात्र प्रत्यक्षात काम न करता मालकाकडून खंडणी घेऊन नंतर ट्रक खाली करू दिला जातो. 

वाढलेले केस गळ्यात जाड सोन्याचा साखळ्या, हातात ब्रेसलेट शर्टाची बटणे उघडी अशा अवस्थेत मोटर सायकलवरून येऊन चित्रपटात शोभेल अशारितीने ट्रक घेरला जातो. मालकाने खंडणी दिल्यावरच हे तथाकथित कामगार तिथून निघून जातात. 

विशेषतः मुंबईच्या उपनगरी भागात आणि नवी मुंबई परिसरात असले प्रकार घडत असतात. एका कामगार नेत्याने तर आपल्या हस्तकांना उपनगरे वाटून दिली आहेत. ट्रकवर पाळत ठेवून वर उल्लेख केल्याप्रमाणे खंडण्या उकळण्याचे प्रकार गेली काही वर्षे होत आहेत. याबाबत तक्रारी वाढू लागल्याने राज्याच्या पोलिस महासंचालकांनी ऑगस्ट २०१५ मध्ये अशा प्रकारांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही. 

माथाडी चळवळही यात बदनाम होत असल्याचे अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

माथाडी चळवळीत आणखी एक प्रकार सुरू आहे तो म्हणजे गुंड डोळ्यांनी माथाडींच्या कामात केलेला शिरकाव. माथाडी कामगार गटाने काम करतात व याला टोळी म्हटले जाते. जेथे चांगली मजुरी मिळते; तेथे गुंड टोळ्या आपल्या हस्तकाचे नाव संबंधित टोळीत घ्यायला मुकादमाला भाग पाडतात. हा हस्तक काम करीत नाही, मात्र महिन्याच्या अखेरीस त्याला सर्व कामगारांच्या बरोबरीने मजुरीत वाटा द्यावा लागतो. माथाडी टोळ्यांना लागलेल्या या एक प्रकारे जळवाच  असतात. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरु असून यातून खून पडण्यासारख्या घटनाही घडल्या आहेत. 

या सर्व प्रकारांबद्दल व्यापारी तसेच संबंधित आस्थापनांनी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने याला आता संघटित स्वरूप येऊ लागले आहे.  या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या प्रकाराकडे लक्ष वेधले असून कारवाईची मागणी केली आहे. 

या गुंडगिरीमुळे लाखो कष्टकऱ्यांना संरक्षण आणि चांगले राहणीमान मिळवून देणारा कायदाच बदनाम होऊ लागला असून, कामगारांची रोजीरोटी त्यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे माथाडी चळवळीत शिरलेल्या या अपप्रवृत्ती शोधून काढून त्यांचा बीमोड करावा, अशी विनंती रामिष्टे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय