Monday, December 23, 2024
Homeग्रामीणहाथरस घटनेचा जनता दलाकडून निषेध; आरोपींना एक महिन्यात फाशी देण्याची मागणी

हाथरस घटनेचा जनता दलाकडून निषेध; आरोपींना एक महिन्यात फाशी देण्याची मागणी


मुंबई
  : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी या मागासवर्गीय मुलीवर झालेला बलात्कार व तिची हत्या अत्यंत संतापजनक घटना आहे. या घटनेने निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशाची मान शरमेने झुकली आहे, अशा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जनता दल ( सेक्युलर ) या पक्षाने केली आहे. 

दुर्दैवाने मृत्यूनंतरही मनिषाची सुटका झाली नाही. घटना दडपण्यासाठीच पोलिसांनी तिच्या मृतदेहावर परवानगीविना व तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत परस्पर मध्यरात्री अंत्यसंस्कार उरकले. योगी सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे घडू शकत नाही! जनता दल सेक्युलर पक्ष एकूणच या घटनेचा धिक्कार करीत आहे.

या प्रकरणाचा एक महिन्यात तपास पूर्ण करून अपराध्यांना फासावर लटकवण्यात यावे, तसेच मनीषाच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणाऱ्या पोलिसांनाही निलंबित करून त्यांच्यावरही खटला भरण्यात यावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

त्याचबरोबर बलात्काराच्या घटनेत फाशीचीच शिक्षा देण्याची तरतूद करण्याची वेळ आता आली आहे. तसेच अशा गुन्ह्यात आरोपी अल्पवयीन असेल तरी त्याला सज्ञान समजून कठोर शिक्षा करण्याची तरतूद करण्यात यावी, अशी पक्षाची मागणी असल्याचे जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय