आळंदी / अर्जुन मेदनकर : इंद्रायणीत पिंपरी चिंचवड हद्दीतून थेट इंद्रायणी नदी केमिकल रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असून याच पाण्यात शुक्रवार झालेल्या (दि.१०) मुसळधार पावसाच्या पाण्यात केमिकल युक्त पाणी सोडण्यात आल्याने पांढऱ्या फेसाने इंद्रायणी नदी फेसाळली. नदीला हिम नदीचे रूप आल्याने भाविक, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदीत पांढऱ्या फेसाचे ढीग नदीचे पाण्यावर तरंगत होते.
इंद्रायणी नदी वर पांढरे फेसयुक्त ढीगच ढीग पसरल्याने हिम नदीचे इंद्रायणी नदीला रूप आल्याचे भाविकांनी पाहत प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचे कामकाजावर नाराजी टप व्यक्त करीत ताशेरे ओढले. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील औद्योगिक क्षेत्र तसेच इंद्रायणी नदी लगतचे उद्योग व्यवसाय येथील सांडपाणी, मैला मिश्रीत आणि रसायन मिश्रीत पाणी थेट कोणत्या हि प्रकारची पाण्यावर प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने आळंदीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. येत्या महिन्यात आळंदीत कार्तिकी यात्रा होत असून कार्तिकी यात्रे पूर्वी नदी प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तात्काळ नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊन सर्व संबधित घटकांनी तातडीची बैठक घेण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने अद्यक्ष राजेश घुंडरे यांनी केली आहे.
येथील आळंदीजनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान सह वारकरी, भाविक यांनी नदी प्रदूषण रोखण्याची मागणी केली आहे. यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन यांना निवेदने देऊन नदी प्रदूषण रोखण्यास साकडे घातले आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने इंद्रायणी नदी प्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे कामकाजावर टीका केली आहे. नदी प्रदूषण करणारे घटक कंपन्यां यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायातून जोर धरत आहे.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी भगवान महाराज कोकरे हे गेल्या ११ दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रदुषणामुळे नदीकाठा वरील राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून सद्या डासांची संख्या या प्रदूषित पाण्याने कमी झाल्याचे यशोधन महाराज साखरे यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, आषाढी आणि कार्तिकी यात्रा दर महा एकादशी, गुरुवार, रविवार दिनी आळंदीत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. स्थान माहात्म्य जोपासत नदीचे पाणी वारकरी प्राशन करतात. यामुळे नदी प्रदूषण रोखण्याची गरज आळंदी पंचक्रोशी सर्कलचे अरुण कुरे व्यक्त केली आहे.
आमरण उपोषणाचा इशारा
इंद्र येऊनिया भुमिसी ! याग संपादिले अहर्निशी !! इंद्रायणी इंदोरीशी ! पंचक्रोशी या पासोनि !!असे इंद्रायणी नदीचे प्राचीन काळापासून महत्त्व असून या इंद्रायणी नदीचे तीरावर श्रीक्षेत्र देहू, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र तुळापूर यासह अनेक गावे, वाड्या वस्त्या असून परिसराचे जीवन फुलविले आहे. दरवर्षी इंद्रायणी नदी काठी लाखो भाविकांचे उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा, श्रींचे पालखी प्रस्थान आषाढी व कार्तिकी वारी आदी धार्मिक कार्यक्रम प्रसंगी भाविक इंद्रायणी स्नान व देवदर्शनास येतात. याकरता इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होणे गरजेचे आहे. याकरता इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमा समाज प्रबोधन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात इंद्रायणी माता नदी दुतर्फ़ा परिसर दोन्ही उत्तर व दक्षिण तट, उगम ते संगम या भागात ग्रामस्थ, नागरिक, वारकरी यांचेशी सुसंवाद साधून पाहणी करून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी. या करता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहल्या नंतर इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमा तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी याकरता जनजागरण यात्रेचे आयोजन केले आहे. दिवाळी या महत्वाच्या सणाच्या निमित्ताने अनेक भाविक श्रीक्षेत्र आळंदी देहू या ठिकाणीं इंद्रायणी स्नान देवदर्शन करुन तीर्थ प्राशन करतात. इंद्रायणी नदीचे झालेले प्रदुषण पाहता यामुळे सर्व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. येणाऱ्या काळात हे प्रदूषण थांबले नाही तर त्याच केमिकल युक्त पाण्यामधे बसून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर यांनी दिला आहे.
नदी प्रदूषण करणाऱ्या सर्व घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
पूर्वी इंद्रायणी नदी बारमाही वाहती होती. आता खेड तालुक्यातील पाणी थेट पुणे, पिंपरी चिंचवड ला तसेच पुण्यातील पाणी पुण्याच्या बाहेरील तालुक्याला देण्यात आले असल्याने इंद्रायणी नदी बारमाही वाहण्यास मर्यादा आल्या आहेत. आता इंद्रायणीतून वाहणारे पाणी हे थेट सांडपाणी वाहते आहे. तीर्थक्षेत्रा आळंदीसह खेडच्या विकासाची शोकांतिका समोर आली आहे. खेड (राजगुरूनगर) चे पाणी आता खेडलाच राखीव राहिले पाहिजे. इंद्रायणी नदी बारमाही वाहती राहिली पाहजे. पुण्याचे पाणी पुण्यालाच राहिले पाहिजे. ते पुण्या बाहेर देणे बंद करा. यासाठी पाणी वाटप समितीचे निर्णय तात्काळ रद्द करण्याची गरज आहे. आपल्या खेडचे पाणी पुण्याला आणि पुण्याचे पाणी पुण्याचे हद्दी बाहेरील तालुक्यांना हे काय गणित आहे. नदी प्रदूषण रोखण्यास प्रदूषण मंडळ कमी पडत असून नदी प्रदूषण करणाऱ्या सर्व घटकांवर फौजदारी दाखल करून कंपन्या या सील करण्याची गरज आहे.अशी सूचना अर्जुन मेदनकर कार्याध्यक्ष नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान यांनी प्रशासनास केली आहे.
भाविक तीर्थयात्रेकरूंच्या भावनांशी खेळू नका
आपल्या हिंदू धर्मामध्ये नद्यांना पवित्र मानले जाते आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आळंदीला येतात आळंदीला आल्यानंतर प्रत्येक भाविकांची एक इच्छा असते इंद्रायणी नदीचा स्नान करून ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्याची इच्छा असते पण आज इंद्रायणी नदी चे प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे की त्यामध्ये स्नानच काय पण स्पर्श केल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारचे आजार होतात. हे काय वेगळं सांगायची गरज नाही आज सकाळीच इंद्रायणी नदीच्या पूर्ण पात्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यावरती तरंगणारा पांढरा फेस पाहून तर असं वाटलं की पाण्यामध्ये काही साबण अथवा लिक्विड मिसळला आहे का अशा पद्धतीने पवित्र इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित झालेल्या आहे. आजही अनेक गावातील भाविक तीर्थ म्हणून इंद्रायणीचे पाणी घेऊन जातात आणि शासन यांच्या भावनेशी खेळत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गणपती विसर्जन केला तर प्रदूषण होऊ नये म्हणून हजारो पोलीस ताईने केलेले असतात अशा पवित्र गणपतीच्या मुळे जर पाणी प्रदूषित होतं तर इंद्रायणी मध्ये डायरेक्ट ड्रेनेजचे मल मिस्त्रीत पाणी सोडले आहे त्या पाण्यामुळे प्रदूषण होते ते शासनाला दिसत नाही का शासन किती दिवस वारकऱ्यांच्या भावनेची खेळणार आहे. म्हणून शासनाला एक विनंती वजा विचार आहे की इंद्रायणी नदीचे पाणी हे पवित्र झालेच पाहिजे, नाहीतर भव्य प्रमाणामध्ये आंदोलन उभे करण्यात येईल. असा इशारा श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांनी दिला आहे.
इंद्रायणीचे पाण्यात पाय, धुवायला पण भीती वाटते
राम कृष्ण हरी, गेली सात वर्ष मी आळंदी, माऊली मंदिराचा ट्रस्टी आहे व इंद्रायणी नदी शुद्धी कारणासाठी खूप प्रयत्न केले आणि बघितले. राजेंद्र सिंह या सारख्या मोठ्या लोकांची व्याख्याने ठेवली, रॅली झाल्या, उपोषण झाले तरी आमच्या इंद्रायणी कडे कोणाचेही लक्ष जात नाही. तिचे प्रदूषण सुरूच आहे, अटॅक आला की कळतं कॉलेस्ट्रॉल वाढल आहे आणि आपण डॉक्टर कडे जातो तसे आमच्या या नदीचे कॉलेस्ट्रॉल वाढले आहे आणि आम्हाला एक उत्तम डॉक्टर हवा आहे. तर आमची मा मोदी साहेबांकडे हीच प्रार्थना आहे की, फक्त नद्यां साठी एक समिती स्थापन करावी जी इडी सारखे काम करेल. ईथे माउलींनी नदीत तपशर्या केली ती आम्हा सगळ्यां अमृत आहे. तिचे प्रदूषण एवढे वाढले आहे की, नदीचे पाण्यात पाय धुवायला पण भीती वाटते. तरी प्रशासन आणि पदाधिकारी मंत्रिमंडळ यांच्याकडे आमची मागणी आहे की इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी लक्ष घालावे. अशी मागणी योगेश देसाई आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त यांनी केली आहे.
इंद्रायणी नदी प्रदूषण कडक कार्यवाही करण्याची आवश्यकता
पवित्र माता इंद्रायणी मध्ये दीपावलीच्या मुहूर्तावर केमिकल मिश्रीत पाणी सोडले गेले आहे. हे पाणी वारकरी भाविक स्नान व तीर्थ प्राशन साठी उपयोगात आणतात. याने नागरिक आणि भाविक यांच्या आरोग्यस धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित कडक कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे यशोधन महाराज साखरे साधकाश्रम आळंदी यांनी म्हटले आहे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231112-WA0041.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231112-WA0039.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231112-WA0040.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231107-WA0061-1-737x1024.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231113-WA0021-1024x1024.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231106-WA0024.jpg)