नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी राक्षसी असा ‘बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (UAPA)’ वापरून त्यातील निरनिराळ्या कलमांखाली दाखल केलेल्या एका एफ आय आर नुसार कित्येक पत्रकार, हास्य अभिनेते, औपरोधिक लेखक, शास्त्रज्ञ, सांस्कृतिक इतिहासकार आणि समालोचक यांच्या घरांवर आज भल्या सकाळी टाकलेल्या छाप्यांच्या कारवाईचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कडकडीत निषेध करत आहे.
हा प्रसारमाध्यमे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बेमुर्वतखोर हल्ला आहे. गेल्या नऊ वर्षांत बीबीसी, न्यूज लॉंड्री, दै. भास्कर, भारत समाचार, द काश्मीरवाला, द वायर आदी माध्ययसमूहांना धाकदपटशा दाखवत छळण्यासाठी मोदी सरकारने तपासयंत्रणांचा सतत गैरवापर केला आहे. आता न्यूजक्लिक या माध्ययसमूहावर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर छापे टाकले आहेत.
सत्तेला सत्य सांगू पाहणारे माध्यमसमूह आणि पत्रकार यांच्यावरील घाऊक हल्ला बिलकूल मान्य केला जाऊ शकत नाही. देशाची सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवण्याची जबाबदारी असलेल्या प्रसारमाध्यमांचा अशा हल्ल्यांद्वारे छळ करत त्यांच्यावर दडपशाही करण्याच्या सुनियोजित कटाचा लोकशाहीवादी देशप्रेमी जनतेने एकजुटीने तीव्र निषेध करण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्यूरो करत आहे.