Monday, December 23, 2024
Homeजिल्हाचिखली-कुदळवाडीतील भंगार मालाच्या दुकानांचे सेफ्टी ऑडिट करा; स्वतंत्र भंगार पार्कसाठी MIDC मध्ये...

चिखली-कुदळवाडीतील भंगार मालाच्या दुकानांचे सेफ्टी ऑडिट करा; स्वतंत्र भंगार पार्कसाठी MIDC मध्ये जागा द्या – CPIM

पिंपरी चिंचवड, दि. १० : चिखली कुदळवाडीतील भंगार मालाच्या दुकानांचे सेफ्टी ऑडिट करा. स्वतंत्र भंगार पार्कसाठी MIDC मध्ये जागा द्या, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतीकुमार कडुलकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, चिखली, कुदळवाडी तसेच इंद्रायणी नदीच्या परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये प्लास्टिक, कागदी पुठ्ठा, लाकूड या ज्वलनशील वस्तूंची भंगार खरेदी विक्रीची दुकाने आणि मोठी गोदामे आहेत. या परिसरात गेले काही वर्षे वारंवार आगी लागून मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर घातक वायूंचे प्रदूषण झालेले आहे. पिंपरी चिंचवड मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांचेकडे किती आगी आणि का लागल्या याचा तपशीलवार लेखाजोखा आहे.

मात्र सर्व सुरक्षा आणि पर्यावरण नियमांचे उलंघन करणार्‍या या दुकानाकडे मनपा आणि संबंधित सरकारी खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे येथे वारंवार आगी लागतात, नागरिकाना श्वसनाचे त्रास होत असल्याचा आरोप कडुलकर यांनी केला आहे.

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण खात्याने धोकादायक मानवी आरोग्य आणि नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कारखान्यातील वस्तू, उपपदार्थ यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष कायदे आणि नियम केलेले आहेत. 

चिखली कुदळवाडीतील भंगार मालाच्या दुकानांचे सेफ्टी ऑडिट करा. त्यामध्ये टाकाऊ कागद, कागदी वस्तू व वेष्टने, काच, रबर, धातू, रंग-गाळ, तेल, राख, जड धातू, टाकाऊ दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टिम्स, रेडिओ, मोबाईल फोन, संगणक, वापरलेले युनिफॉर्म, हातमोजे, पायमोजे, बूट ई वस्तूची भंगार श्रेणीत वर्ग केलेल्या औद्योगिक कचऱ्यामुळे परिसर पर्यावरण आणि मानवी वस्तीला धोका निर्माण होऊ नये. यासाठी संबंधित व्यापारी, शासकीय अधिकारी, शहराच्या व्यवस्थापकांनी काय केले पाहिजे यासाठी कठोर मार्गदर्शक नियमावली आहे, परंतु अंमलबजावणी होत नसल्याचेही म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड आणि लगतच्या औद्योगिक अस्थापनातील स्क्रॅप चिखली कुदळवाडी परिसरातील हजारो दुकानांमध्ये साठवले जाते. भंगार विलगिकरण, पॅकिंग करणाऱ्या शेकडो कामगार असुरक्षित परिस्थितीत काम करत असतात. याठिकाणी आगी लागून गोरगरीब कामगार मृत्युमुखी पडून उरवडे मुळशी सारखी दुर्दैवी घटना घडू शकते. संपूर्ण परिसर, पर्यावरण आणि मानवी आरोग्यास धोकादायक आहे. केव्हाही मोठ्या प्रमाणात आगी लागू शकतात. निवासी क्षेत्रात असलेल्या या दुकानांना स्वतंत्र भंगार पार्क साठी अन्यत्र जागा मिळवून द्यावी, अशी मागणी कडुलकर यांनी केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय