पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : देशाच्या अर्थव्यवस्थेत एकटा अदानी समूह सक्षम ठरवला गेला आहे. वीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा होऊनही त्याविषयी मोदी अवाक्षरही बोलायला तयार नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळातील पंचाहत्तर वर्षांत विरोधी पक्षनेत्याचे सदस्यत्व काढून घेण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे. २०१४ पूर्वी देशात अनेक आंदोलने करण्यात आली; पण ती कधीच दडपण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला नाही.
बलात्कारी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे स्वागतही यापूर्वी कधीच करण्यात आले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करावा अशा थाटात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत. देशातील लोकशाहीची वेगाने अध:पतनाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.विश्वंभर चौधरी यांनी केले.
चिंचवड, मोहननगर येथील जय भवानी तरुण मंडळाच्या फुले, शाहू, आंबेडकर प्रबोधन व्याख्यानमालेत ‘भारतीय राजकारणाची दशा आणि दिशा’ या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘बेरोजगारी, महागाई याविषयी प्रश्न विचारल्यावर देशद्रोही ठरवले जाते.’ मन की बात’ हा नरेंद्र मोदींचा एकतर्फी संवाद आहे. संविधानिक मूलतत्त्वे लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मोदी शहा पुन्हा निवडून येता कामा नयेत. ॲड. वैशाली काळभोर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.