पिंपरी (दिनांक : २१ एप्रिल २०२३) “समाजव्यवस्था ही शोषणावर अवलंबून असते. सर्व महापुरुषांनी शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहिले. त्यामुळे व्यवस्था शोषणमुक्त होणे गरजेचे आहे!” असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, कष्टकरी संघर्ष महासंघ – महाराष्ट्र आणि आशिया मानवशक्ती विकास संस्था आयोजित बत्तिसाव्या श्रम – उद्योग परिषदेचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्यवाह उद्धव कानडे, कष्टकरी संघर्ष महासंघ अध्यक्ष काशिनाथ नखाते, आशिया मानवशक्ती विकास संस्था अध्यक्ष बाजीराव सातपुते, कामगार साहाय्यक आयुक्त समाधान भोसले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष सुदाम भोरे स्वागताध्यक्षपदी होते. आंतरराष्ट्रीय कामगारदिन आणि महाराष्ट्र राज्य स्थापनादिनाचे औचित्य साधून मुव्हटेक कन्व्हेअर्स प्रायव्हेट लिमिटेड (महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार २०२३), प्रगती प्रेस टूल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (औद्योगिक सुरक्षितता पुरस्कार), एस. के. एफ. बेअरिंग इंडिया एम्प्लॉईज युनियन (कामगार हितसंवर्धन कामगार संघटना पुरस्कार) या आस्थापनांना प्रदान करण्यात आलेत. मुरलीधर दळवी, शरद काणेकर, राजू जाधव यांना (श्रमसारथी सन्मान २०२३)ने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर नीलेश भोसले (स्मशानभूमी सेवक), महादेव माने (गटई मजूर), तानाबाई मोहिते (मोलकरीण), महेशकुमार रामशरण राम (पीठगिरणी मजूर), बालाजी लोखंडे (हातगाडीधारक), सुषमा सुतार (घरेलू मजूर), मिहीर चव्हाण (शवविच्छेदक मजूर), महादेव गायकवाड (बांधकाम मजूर) आणि प्रमिला कुदळे (भाजीपाला विक्रेत्या) या उपेक्षित कष्टकऱ्यांना सन्मानचिन्ह, पूर्ण पोशाख, शाल, मिठाई प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी १७व्या कामगार साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याप्रीत्यर्थ कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. शवविच्छेदक मजूर मिहीर चव्हाण यांनी, ‘मृत माणसापेक्षा जिवंत माणसांची भीती वाटते!’ , स्मशानभूमी सेवक नीलेश भोसले यांनी, ‘माझे काम हे जनसेवा आहे!’ आणि ‘शिक्षण नसल्याने वयाची सत्तरी ओलांडली तरी कष्टाची कामे करावी लागतात!’ या मोलकरीण तानाबाई मोहिते यांच्या उत्तरांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. आशिया मानवशक्ती विकास संस्था अध्यक्ष बाजीराव सातपुते यांनी प्रास्ताविक केले. “हा महाराष्ट्राच्या घामाचा सन्मान आहे!” असे मत व्यक्त करून उद्धव कानडे यांनी स्वानुभवकथन केले. काशिनाथ नखाते यांनी, “स्वातंत्र्योत्तर काळानंतरही पंचाहत्तर वर्षांत ९३ टक्के असंघटित कामगारांची उपेक्षा थांबलेली नाही!” अशी खंत व्यक्त केली. कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “सुमारे ५६ लाख कामगार महाराष्ट्र कामगार मंडळाशी संलग्न आहेत. पिंपरी-चिंचवड ही गुणवंत कामगारांची खाण आहे!” अशी माहिती दिली.
वृक्षाला पाणी घालून आणि संगीता झिंजुरके यांनी गायलेल्या ‘ठेचा भाकरी’ या श्रमिकगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अरुण गराडे, सुरेश कंक, राजेंद्र वाघ, मानसी चिटणीस, वर्षा बालगोपाल, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
७४९८१८९६८२
९४२१३०८२०१