पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातून उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेल्या मुलामुलींनी जर्मनी आणि अमेरिकेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. अमृता कडुलकर, सुमित कदम, सना दिवाडकर, तेजस तलाठी (पिंपरी चिंचवड, पुणे) सह आदिती ठाकरे (नाशिक), स्वप्निल देशमुख (औरंगाबाद), करण गंगनानी (वडोदरा) यांनी मानहाइम बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्य (जर्मनी) येथे संयुक्तपणे निवासस्थानी गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली.
पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद शहरातील नावाजलेल्या महाविद्यालयातील प्राविण्य मिळवलेले हे सर्व विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जर्मन विद्यापीठात निवड झालेले आहेत. ऋतुजा पारखी (चिंचवड) या विद्यार्थिनींने मिशिगन डिअर बॉर्न (अमेरिका) येथे गणेश प्रतिष्ठापना केली.
मातृभूमीपासून साता समुद्रापार दूर आहोत, आम्ही आमचे सण, उत्सव विसरू शकणार नाही. आम्हाला भारतीय संस्कृतीतील बंधुभाव, विश्व ऐक्य भावना सतत प्रेरणा देत असते, असे अमृता कडुलकर, ऋतुजा पारखी, सुमित कदम यांनी सांगितले. आम्ही श्री गणेशाच्या टिकाऊ आणि सुबक मूर्ती भारतातून इकडे आणल्या आहेत, आम्हाला सर्व आरत्या पाठ आहेत. जगातील आणि आमच्या देशातील कोरोना महामारी लवकर समाप्त होईल, सर्वांना आरोग्य आणि निर्मळ जीवन प्राप्त व्हावे, अशी आम्ही प्रार्थना केली आहे, असे सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्हीडिओ कॉल करून सांगितले