Thursday, September 19, 2024
HomeNewsजुन्नर : निमगिरी येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जुन्नर : निमगिरी येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

निमगिरी : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील निमगिरी येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल निंबा रढे गुरुजी यांच्या वतीने अंगणवाडीतील 22 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रामचंद्र अनाजी साबळे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे न्यु इंग्लिश स्कुल निमगिरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.आर.पवार आणि विज्ञान शिक्षक डी.एस.केंद्रे होते.

या कार्यक्रमासाठी श्रीराम काळेकर, वसंत साबळे, जीवन रढे, भास्कर भालेराव, उत्तम साबळे, जिजाराम कोकणे, वाळू रढे, जनार्दन रढे, सुनिल रढे, अंगणवाडी शिक्षिका अरुणा डाके, अंगणवाडी सेविका नयना लांडे, महिला पालक उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक ए.आर.पवार यांनी आपल्या भाषणात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संतुलित, समृद्ध आणि सकस आहाराचे महत्त्व विशद केले. विज्ञान शिक्षक डी.एस. केंद्रे यांनी आपल्या मनोगतात परिसरातील शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील विविध विधायक उपक्रमांचे कौतुक केले.विठ्ठल रढे गुरुजी यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक क्षेत्रातील सेवानिवृत्तीनंतर लहान बालकांना मोफत गणवेश वाटप करुन शैक्षणिक क्षेत्रातील कामाची आवड जोपासल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन रढे यांनी केले तर भास्कर भालेराव यांनी आभार मानले. नवीन गणवेश मिळाल्याने लहान बालकांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय