जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रात होणाऱ्या अवैध माती उत्खननाबाबत लक्ष घालून योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी विभागीय वन हक्क समिती, पुणे विभाग चे सदस्य विद्या जावळे आणि किरण लोहकरे यांनी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मातीचा सुपीक थर तयार होण्यासाठी लाखो वर्षाचा कालावधी लागतो. जुन्नर तालुक्यातील पश्चिम भाग हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून त्याचा समावेश इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये करण्यात आला आहे. माती व जैवविविधता यांचा परस्पर संबंध असून या अवैध माती उपशामुळे या परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. हा अवैध माती उपसा अशाच प्रकारे सुरु राहिल्यास भविष्यात या भागात पर्यावरणीय समस्या निर्माण होऊन त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होण्याचा संभव आहे.
‘बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे sanitization सुरू’ संजय राऊत यांच्या ट्विटमुळे खळबळ
तसेच जुन्नर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील सर्व गावांना पेसा कायदा लागू आहे. अवैध माती उपशामुळे पेसा गावांना पेसा कायद्याने असलेल्या नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाबाबत असणाऱ्या अधिकारांचे हनन होत आहे. माती उत्खनन करणाऱ्या तस्करांनी शासकीय जागांवरही (वनांचे क्षेत्र, जलसंपदा व लघुपाटबंधारे विभागाचे क्षेत्र) मोठ्या प्रमाणात माती उपसा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात माती उपसा होऊनही प्रशासनाकडून माती उपसा करणाऱ्या तस्करांना जरब बसलेली नाही. माती उपसा करणाऱ्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची सारखे प्रकार होऊनही राजकीय दबावापोटी ही प्रकरणे दाबली गेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बेरोजगारी विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाची निदर्शने
तसेच या प्रश्नाकडे विशेष लक्ष घालून हा अवैध माती उपसा थांबवावा व संबंधितावर कडक कारवाई करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी विभागीय वन हक्क समिती, पुणे विभाग चे सदस्य विद्या जावळे किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे उपस्थित होते.