पुणे : हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) परिसरात आज सकाळी मिनी-बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत चार आयटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना हिंजवडी आयटी पार्क फेज 1 मधील हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (HIA) कार्यालयाजवळ सकाळी अंदाजे 7.30 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मिनी-बसच्या ड्रायव्हर सीटजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत बसमधून उडी मारून जीव वाचवला. मात्र, बस दुभाजकावर आदळल्याने मोठा अपघात घडला.
Hinjewadi IT Park | बसला भीषण आग
या दुर्घटनेत व्योमा ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी होते. मृतांची ओळख सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण अशी पटली आहे. पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, बस खासगी कंपनीची होती की कर्मचाऱ्यांनी खासगी बसने प्रवास केला होता, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
