India vs New Zealand : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (ICC Champions Trophy 2025 Final) अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हे प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावत दणदणीत विजय मिळवला.
न्यूझीलंडची संयमी खेळी, मिशेल आणि ब्रेसवेल चमकले
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ५० षटकांत ७ विकेट्सच्या मोबदल्यात २५१ धावा केल्या. न्यूझीलंडकडून स्टार अष्टपैलू डॅरिल मिशेलने ६३ धावांची शानदार खेळी केली. मायकेल ब्रेसवेलने नाबाद ५३ धावा करत संघाचा डाव सावरला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यास मज्जाव केला.
भारतीय संघाची दमदार सुरुवात (ICC Champions Trophy)
२५२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात जोरदार झाली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. ८३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार लगावत रोहितने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगलेच धोपटले. श्रेयस अय्यरनेही ४८ धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांची झुंज अपुरी
न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर काइल जेमिसन आणि रचिन रवींद्र यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली. मात्र, भारतीय फलंदाजांनी संयम राखत ४९व्या षटकांत फक्त ६ विकेट्स गमावून विजयावर शिक्कामोर्तब केले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची दुसरी मोठी ट्रॉफी
हा विजय भारतासाठी खास ठरला आहे कारण गेल्या आठ महिन्यांत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. याआधी, भारताने २०२४ टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते. तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत टीम इंडियाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

हे ही वाचा :
मोठी बातमी : शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस जारी, वाचा काय आहे प्रकरण !
संतापजनक : मद्यधुंद तरुणाचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खूलासा
मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत