जखमीवर वायसीएम रुग्णालयात उपचार (Alandi)
आळंदीत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील भागीरथी नाल्यावर पिसाळलेला कुत्रा चावल्याने आळंदीतील लहानग्या पासून जेष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना जखमी केले. यात पिसाळलेल्या कुत्र्याने युवकाचे गालाचा चावा घेतल्याने जखमी युवकास पिंपरीतील वाय. सी. एम. रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. युवकाचे गालावर दोन टाके पडले असून जखमी दीपक गव्हाळे या युवकावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे आळंदीतील मोकाट कुत्र्यायांचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Alandi)
आळंदी येथील घाणीचे साम्राज्य असलेल्या भागीरथी नाल्यावरून येजा करीत असताना पिसाळलेला कुत्रा अनेकांना चावल्याने जखमीवर आळंदी ग्रामीण रूग्णालय, खाजगी दवाखाने, क्लिनिक मध्ये उपचार सुरु आहेत. नियमित उपचारातील डोस दिले जात असून कुत्रा चावल्याने नागरिकांत कुत्र्यांची दहशत पसरली आहे. कुत्रा जेरबंद करून पिंज-यात सुपूर्द करण्यात आला आहे. भटकणाऱ्या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली घुंडरे पाटील यांनी केली आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत अँटी रेबीज प्रतिबंधात्मक लशीकरण करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मोहीम सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. भाजी मंडई परीसर, सार्वजनिक मोकळ्या जागा, रस्ते, इंद्रायणी नदी घाट, मरकळ रस्ता, चावडी चौक, वडगाव रस्ता, भैरवनाथ चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे फिरत असतात. यामुळे दिवसा, रात्री अपरात्री मोकाट कुत्रे नागरिकांचे अंगावर धावून जातात. वडगाव चौक, चावडी चौक, मंदिर परिसर, मरकळ रस्ता, शालेय परिसरात फिरत असलेली मोकाट कुत्रे यामुळे शाळेची मुले, मुली, जेष्ठ नागरिक, प्रवासी, वारकरी भाविक यांना रहदारीला गैरसोयीचे व भीतीदायक झाले आहे.