शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले उचलण्याची मागणी
नवी दिल्ली : राज्य विधानसभेचे निवडणूक निकाल रविवार, २ मे रोजी जाहीर झाल्यापासून पश्चिम बंगालमध्ये भयानक हिंसाचार उफाळला आहे. ज्या पक्षाने निवडणुका जिंकल्या आहेत त्या तृणमूल कॉँग्रेसने हा हिंसाचार सुरू केला आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यात या हिंसाचाराचे स्वरूप म्हणजे केवळ भाजपमध्ये गेलेल्यांवर हल्ला करून तृणमूल कॉँग्रेसचे पाठीराखे घेत असलेला बदला असे दाखवले जात आहे, पण समाजाच्या इतर गटांवर लादलेल्या हिंसाचाराकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप जनवादी महिला संघटनेने केला आहे.
तसेच मुख्य प्रवाहातील माध्यमांनी मौन का पाळले आहे ? असा सवालही जनवादी महिला संघटनेने केला आहे. तसेच खालील मुद्दे उपस्थित केले आहेत.
● जनतेच्या ज्या कुठल्या गटाने सत्ताधारी पक्षाला विरोध केला असल्याची शंका आहे. उदा. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), इतर डावे पक्ष तसेच कॉग्रेस व आयएसएफ चे कार्यकर्ते व पाठीराखे, म्हणजे जे संयुक्त मोर्चात सहभागी होते त्या सर्वांवर तृणमूल कॉँग्रेस निर्घृण हल्ले चढवित आहे.
● जनतेवरील हिंसाचाराबद्दल पूर्णपणे असंवेदनशील असलेला भाजप याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी अधिकाधिक अफवा पसरवून आगीत तेल ओतून दोन्ही बाजूंकडून संघर्षाला धार्मिक वळण कसे लागेल या प्रयत्नात आहे.
याचा परिणाम म्हणून आत्तापर्यंत राज्यात १२ लोकांचा बळी गेला, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत. यात पहिला बळी गेला तो भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि जनवादी महिला संघटनेची कार्यकर्ती असलेल्या पूर्व बरद्वान, जमालपूर मधील नबग्राम येथील काकोली क्षेत्रपाल यांचा. मतदानाच्या दिवशी त्या पक्षाच्या निवडणूक बूथवर काम करत होत्या. ३ मे रोजी त्यांच्या स्वतःच्या घरात घुसलेल्या हत्यारबंद तृणमूल कॉग्रेसच्या समाजकंटकांशी संघर्ष करत असताना चॉपरने असंख्य वार करून त्यांना ठार करण्यात आले. डाव्या पक्षांचे कार्यकर्ते, लाल स्वयंसेवक जे कोरोना बाधित लोकाना मोफत सेवा पुरवीत होते त्यांच्यावर हल्ले केल्याच्या, पक्ष कार्यकर्त्यांच्या घरांवर, पक्षाच्या व युनियनच्या ऑफिसवर हल्ले केल्याच्या, ती जाळून टाकण्याच्या अनेक घटना आहेत ज्या मुख्य प्रवाहातील माध्यमातून गायब आहेत, असेही जनवादी महिला संघटनेने म्हटले आहे.
प्रशासन निष्क्रिय आहे आणि ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ममता बॅनर्जीनी देखिल शांतता स्थापनेच्या शाब्दिक आवाहनाखेरीज काहीही केलेले नाही, असा आरोप जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मालिनी भट्टाचार्य, राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी केला आहे.
जनवादी महिला संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
▪️निवडणुकीनंतर उफाळलेला हिंसाचार थांबवून शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी राज्य शासनाने त्वरित पावले उचलावीत.
▪️या हिंसाचाराचे बळी ठरलेल्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण व नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.
▪️ग्रामीण तसेच शहरी भागात अशांतता पसरवणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.