मावळ / क्रांतीकुमार कडुलकर : आदिवासी समाजात मृत पावलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार परंपरेने जमिनीत दफन करून केले जातात. मागील चाळीस वर्षा पासून सुदुंबरे, संत तुकाराम नगर, ठाकरवाडी येथील आदिवासी बांधव दोन गुंठ्यांत अंत्यविधी करत आहेत. मात्र ही अपुरी जागा असल्याने दफनभुमीसाठी अधिक जागा मिळावी अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली आहे.
माकप पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजात मृत पावलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार परंपरेने जमिनीत दफन करून केले जातात. यासाठी त्यांना दोन गुंठे जागा आहे, त्या अपुऱ्या जागेत दफनविधी करण्यास पुरेशी जागा व सुविधा नाही. तरी आदिवासींसाठी स्वतंत्र दफनभूमी विकसित करावी, मागील काही काळापासून ही मागणी करण्यात येत असूनही ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप माकपने केला आहे.
सुदुंबरे, संत तुकाराम नगर, ठाकरवाडी येथील आदिवासींच्या विविध मागण्यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना निवेदन दिले. माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश दराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात अँड.नाथा शिंगाडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, बाळासाहेब शिंदे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या अपर्णा दराडे, अँड.अमिन शेख, नामदेव सूर्यवंशी यांसह जनाबाई जाधव, मीराबाई भांगे, दादाभाऊ जाधव, सोनाली जाधव, ताई मेडाळे इ. सदस्य सहभागी झाले होते.