Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदीत दृष्टीहिनांचे तीन दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण

आळंदीत दृष्टीहिनांचे तीन दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण

आळंदी/अर्जुन मेदनकर:द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या वतीने दृष्टीहीन बांधवांच्या ब्रेल लिपी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन आळंदी येथील भक्त निवास सभागृहात हरिनाम गजरात झाले. या प्रसंगी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण भारस्कर, आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ला. डॉ. शालिग्राम भंडारी आदी मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन झाले. यावेळी केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गौरवलेले दृष्टीहीन ह. भ.प. गणपती महाराज जगताप म्हणाले की ज्ञानेश्वरीची अनेक भाषात भाषांतर झाली.

मग दृष्टिहीन बांधवांनाही ज्ञानेश्वरी वाचता यावी या उद्देशाने ब्रेल भाषेत ज्ञानेश्वरी लिहिण्यात आली. ज्ञानेश्वरी हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ग्रंथ आहे. दृष्टी हिनाच्या जीवनातही ब्रेल ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रकाश निर्माण झाला आहे.
आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, ज्ञानेश्वरी मधून तरुण पिढी सह सर्वांना जीवनात समाधानी राहण्याचा जीवन विशेष दृष्टिकोन मिळतो. आळंदी परिसरातील दृष्टीहीन बांधवांसाठी नगरपालिका पातळीवर विविध योजनांचा लाभ देण्यात येईल असे केंद्रे यांनी सांगितले. लायन डॉ. शालिग्राम भंडारी यांनीही ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानावर आधारित आपले विचार व्यक्त केले. पाच दृष्टी हिनांना ब्रेल ज्ञानेश्वरी चे वाटप करण्यात आले.

ज्ञानेश्वरी पारायणचे नेतृत्व व्यासपीठावरून ह. भ. प अमोल महाराज घाईके, दृष्टीहीन ह. भ. प गणपतराव जगताप महाराज यांनी केले. यावेळी नवव्या बाराव्या पंधराव्या आणि अठराव्या अध्यायाचे पारायण करण्यात आले. या तीन दिवसीय ब्रेल ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात संध्याकाळी दिव्यांग कीर्तनकार अमोल महाराज बागडे, कीर्तनकार अमोल भाईजी यांचे कीर्तन प्रवचन होत आहे. या ज्ञानेश्वरी पारायणासाठी महाराष्ट्राच्या सर्व भागातून दृष्टिहीन बांधव मोठ्या संख्येने आळंदीत आले आहेत. त्यांच्या करिता आळंदी देवस्थान आणि परिसरातील सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून दिल्याचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय